मराठी रसिक प्रेक्षक सध्या एका चित्रपटाची आतुरतेने वाटत पाहत आहेत तो म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा २’. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सगळे प्रेक्षक प्रदर्शनाकडे डोळे लावून बसले आहेत. ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाचं अजून चित्रीकरण सुरू आहे. अशातच ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी ‘महाएमटीबी’च्या पॉडकास्टमध्ये ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी अभिनेते प्रशांत दामले यांची या चित्रपटातील भूमिका का कट केली? याविषयी सांगितलं.
अभिनेते जयवंत वाडकर म्हणाले की, ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात तुम्ही आहात वगैरे, हे मला सचिन पिळगांवकर यांनीच सांगितलं होतं. सुरुवातीला आम्हाला माटुंग्यातील संकुल थिएटरमध्ये चित्रपटाची कथा वाचण्यासाठी बोलावलं होतं. चित्रपटातील सगळे कलाकार आले होते. आम्ही बँचवर बसून वाचन केलं होतं. मला घड्याळात वेळ लावण्याची सवय आहे. तेव्हा वाचन सुरू होण्यापूर्वी मी घड्याळात वेळ लावली. संपूर्ण वाचन सव्वा तीन तासांचं झालं. त्यामुळे मी, प्रदीप पटवर्धन आम्ही सचिन यांना म्हटलं, तीन-सव्वा तीन तास झालेत. तेव्हा ते म्हणाले, अरे हो काय? आई शप्पथ! मग यावेळी प्रशांत दामलेची भूमिका कट केली.
हेही वाचा – मुग्धा वैशंपायनला ‘काकू’ म्हणणाऱ्या युजरला प्रथमेश लघाटेने दिलं चोख उत्तर, म्हणाला, “माकड म्हणतं…”
“‘नवरा माझ्या नवसाचा’ चित्रपटात प्रशांत दामले होता. तो येतो, अंताक्षरी खेळतो वगैरे मग त्याला तो पुतळा दिसतो आणि तो बसमधून उरतो. जशी रिमा लागू वगैरे यांची भूमिका होती तशीच त्याची भूमिका होती. पण वेळे जास्त होतं होता. त्यामुळे प्रशांत दामलेची भूमिका कट केली,” असं जयवंत वाडकर यांनी सांगितलं.
हेही वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचकुलेंना मिळाली डॉक्टरेट पदवी! म्हणाले, “माझं योगदान…”
दरम्यान, २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. अजूनही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील गाणी असो, डायलॉग असो किंवा भूमिका आजही त्यावर मराठी रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, रीमा लागू, विजय पाटकर, कुलदीप पवार, सतिश तारे, प्रदीप पटवर्धन, अतुल परचुरे, आनंद अभ्यंकर, विकास समुद्रे, अली असगर, सुनिल तावडे, वैभव मांगले, मधुराणी गोखले, जॉनी लिव्हर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, जयवंत वाडकर असे अनेक तगडे कलाकार पाहायला मिळाले होते.