मराठी कलाविश्वात सध्या हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत हा चित्रपट आता १० कोटींच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’च्या पहिल्या भागाला सुद्धा प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या भागात सगळ्या बायका लंडन ट्रिपवर गेल्या होत्या, तर ‘झिम्मा’च्या दुसऱ्या भागात या बायकांच्या रियुनियनची सुंदर अशी कथा दाखवण्यात आली आहे. या रियुनियनच्या माध्यमातून चित्रपटात महिलांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींवर भाष्य करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरं लग्न, फक्त आई होणं म्हणजे बाई होणं नसतं, मूल न होणं, वाढत्या वयानंतरचं आयुष्य असे अनेक विषय ‘झिम्मा २’मधून मांडण्यात आले आहेत. चित्रपटात या सगळ्या गोष्टी अधोरेखित करण्यामागची संकल्पना नेमकी काय होती? यावर ‘झिम्मा २’चा दिग्दर्शक हेमंत ढोमेने राजश्री मराठीच्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

दिग्दर्शक हेमंत ढोमेला एका सामान्य गृहिणीने, “स्त्रियांच्या जीवनातील गंभीर समस्या मोठ्या पडद्यावर मांडाव्यात ही संकल्पना नेमकी कधी व कशी सुचली?” असा प्रश्न विचारला. यावर हेमंत म्हणाला, “एखाद्या स्त्रीला मूल न होणं म्हणजे खूप काहीतरी भयंकर या गोष्टी मी स्वत: अनुभवल्या आहेत. स्त्रीला स्वत:चं मूल नाही म्हणजे तिचा जन्मच वाया गेला या सगळ्या गोष्टी आजच्या काळात बोलल्या जातात.”

हेही वाचा : “माझ्या बाळांनो”, क्रांती रेडकरची जुळ्या मुलींसाठी खास पोस्ट! दोघींना सल्ला देत म्हणाली, “तुमच्या आईने…”

हेमंत पुढे म्हणाला, “३० वर्षांपूर्वी असे प्रकार होत असते, तर कदाचित आपण समजून घेतलं असतं. पण, आजच्या काळात अशी मानसिकता असणं हे वाईट आहे. कारण, अलीकडच्या काळात मूल होण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यावर आमच्या सिनेमात एक सुंदर वाक्य आहे ते म्हणजे, ‘एखाद्या स्त्रीला स्वत:चं मूल नसणं हा सुद्धा एक पर्याय आहे’, मूल हवं की नको हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे.”

हेही वाचा : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; कलाकारांनी शेअर केले शेवटचे खास क्षण

“मला वाटलं हा विषय मांडण्याचं हेच एक योग्य माध्यम आहे. आम्ही जेव्हा कथेवर काम करत होतो, तेव्हा क्षिती म्हणाली होती, हा खूपच संवेदनशील विषय आहे त्यामुळे कदाचित अनेकांना हे मत पटणार नाही, आपला प्रेक्षकवर्ग तुटू शकतो. पण, मी सुरुवातीपासून म्हणत होतो…हा भाग कथेत ठेवायचा आणि आपल्या प्रेक्षकांना समजावून, खूप प्रेमाने आपण ही गोष्ट सांगायची. आमच्या दोघांची यावर खूप चर्चा झाली आणि हा भाग मूळ कथेत असणार हे पक्क ठरलं. यानंतर मनालीच्या भूमिकेसाठी शिवानीचं कास्टिंग झालं आणि तिने या भूमिकेला शंभर टक्के न्याय दिला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर हा विषय लोकांनी खूप सुंदर पद्धतीने आपलासा केला हे मला जाणवलं याबद्दल आज मनात प्रचंड आनंद आहे.” असं हेमंत ढोमेने सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jhimma 2 director hemant dhome on talks about sensetive storyline of the movie sva 00