हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ काल (२४ नोव्हेंबरला) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा पहिला भाग ‘झिम्मा’ २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आता ‘झिम्मा २’लाही प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहेत. ‘झिम्मा २’ने पहिल्याच दिवशी १.२० कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, ‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा २’ चे पूर्ण शूटिंग परदेशात झाले आहे. एका मुलाखतीत हेमंत ढोमेने महाराष्ट्रापेक्षा परदेशात चित्रपटाचे शूटिंग करणं सोप्प का आहे, यामागचं कारण सांगितलं आहे.
हेही वाचा- “हा ‘झिम्मा’ आधीपेक्षा…”, ‘झिम्मा २’बद्दल चिन्मय मांडलेकरने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
नुकतंच हेमंतने अजब-गजब या यूट्यूूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्याने चित्रपटाच्या शूटिंगपासून कलाकारांशी निगडीत अनेक किस्से सांगितले. हेमंत अनेकदा चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी लंडनला जातो. या मुलाखतीत हेमंतला तू शूटिंगसाठी सारखा लंडनला का जातो, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देत हेमंतने लंडनमध्ये शूटिंग करणं सोप्प का आहे याबाबतचा खुलासा केला आहे.
हेमंत म्हणाला, “शूटिंगसाठी एशियाटिक लायब्ररी घ्यायची झाली तर अडीच ते तीन लाख रुपये भरावे लागतात. तीसुद्धा रविवारीच घ्यायची. त्याअगोदर खूप साऱ्या परवानग्या घ्याव्या लागतात. सी लिंकवर शूटिंग करण्याची परवानगी कायदेशीररित्या घ्यायला गेलं तर साडेतीन लाख रुपये भरावे लागतात, तेही जेमतेम तासांसाठी. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे आपली सिस्टीम एवढी वाईट आहे की, या सिस्टीममध्ये शूटिंग करताना पोलिसांना पैसे द्यावेच लागतात. तुम्हाला ग्रामपंचायतीला पैसे द्यायचेत, तुम्हाला पोलीस यंत्रणेला पैसे द्यायचेत. शूटिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचं घर आलं तर त्यालाही पैसे द्यावे लागतात.”
हेमंत पुढे म्हणाला, “लंडनची सुटसुटीत वन विंडो सिस्टीम आहे. परवानगी घेतानाच तुम्हाला तिथं द्यावं लागतं, तुम्ही कुठे शूटिंग करणार आहात आणि किती लाईट वापरणार आहात. त्यानंतर तुम्ही रस्त्यावर कुठेही शूट करा, गोंधळ घाला, कोणाचंही घर येऊदे, कोणीही तुम्हाला विचारायला येत नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने मराठी निर्मात्यांना ते सोप्प वाटतं आणि दुसरं म्हणजे मी सारखं लंडनला शूटिंगला जातो, कारण त्याचे पैसे वसूल होतात.”
‘झिम्मा २’मध्ये सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या कथेबरोबरच त्यातील गाण्यांनाही प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.