सध्या महाराष्ट्रात ‘झिम्मा २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना सात बायकांच्या रियुनियनची कथा अनुभवायला मिळणार आहे. यंदाची ‘झिम्मा २’ ट्रिप इंदू डार्लिंगच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, सायली संजवी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर नोव्हेंबर महिन्यात ‘नाळ २’, ‘श्यामची आई’ आणि आता ‘झिम्मा २’ असे एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. सगळेच चित्रपट एकत्र प्रदर्शित झाल्याने अनेकदा कोणता चित्रपट पाहायचा यावरून प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो किंवा एकावेळी तीन सिनेमे पाहणं प्रेक्षकांना शक्य होत नाही. मराठी चित्रपटांचं बॉक्स ऑफिसवर होणारं क्लॅशिंग आणि प्रेक्षकांचं बजेट यावर अजब गजबला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक हेमंत ढोमेने भाष्य केलं आहे.
एकाच महिन्यात तीन सिनेमे पाहण्याचं आमचं बजेट नाहीये. अशी ओरड अनेकदा प्रेक्षकांकडून केली जाते. त्यातही प्रत्येक दिग्दर्शकाला आपलाच सिनेमा चांगला वाटतो अशावेळी काय करायच? याबाबत मत मांडताना अभिनेता हेमंत ढोमे म्हणाला, “आपण या वर्षी सुरूवातीलाच शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट पाहिला. या चित्रपटाला सर्वाधिक प्रतिसाद मुंबई-पुण्यात मिळाला. हे चित्रपट पाहणारे प्रेक्षक कोण आहेत? याचा अर्थ काय होतो? प्रेक्षक येऊन, खर्च करून सिनेमा बघतो. प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन काहीतरी पाहावंसं वाटणं हे जास्त महत्त्वाचं आहे.”
“‘कांतारा’ चित्रपटाला पुण्यात मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग लाभला. ‘RRR’, ‘दृश्यम’ घ्या नाहीतर ‘जवान’ घ्या कोणतेही चित्रपट मुंबई-पुण्यात सर्वाधिक कलेक्शन करतात. प्रत्येक चित्रपट मनाला भिडणारा किंवा चांगला पाहिजे ही प्रेक्षकांची मूळ अपेक्षा असते. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना चित्रपटगृहाचं तिकीट परवडत नाही ही संकल्पना एकदम चुकीची आहे. हा गोड गैरसमज आपण आपला करुन घेतलाय. सामान्य माणसाला बिचाऱ्याला महिन्याला एकच तिकीट परवडतं…अशी समजूत आपण केलीये. पण, एखादा चित्रपट सकस मनोरंजन करणारा असेल, तर नक्कीच प्रेक्षक दर शनिवारी सिनेमे पाहतील. अर्थात चित्रपट सुद्धा तेवढेच उत्तम हवेत.” असं हेमंत ढोमेने सांगितलं.”
मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या तुलनेने कमी स्क्रीन्स का मिळतात? याबद्दल हेमंत म्हणाला, “चित्रपटगृहांमध्ये आपल्याला कमी स्क्रीन्स मिळतात याला आता काहीच पर्याय नाही. मी स्वत: याबद्दल लढा दिलाय…पण आता पर्याय नाही कारण, आपली स्पर्धा थेट बॉलीवूडशी होते. याचं मुख्य कारण आहे मुंबई…हेच तुम्ही चेन्नईत पाहिलात, तर त्यांची स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात बॉलीवूडशी नाहीये. त्या लोकांनी स्वत:च्या इंडस्ट्रीत स्वत:चे वेगळे सुपरस्टार्स बनवले आहेत.”