मराठी मनोरंजनविश्वात सध्या ‘झिम्मा २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘झिम्मा’चा पहिला भाग २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन हेमंत ढोमेने केलं आहे. हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांची पहिली भेट नाटकाच्या सेटवर झाली होती. यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केलं. नुकताच त्यांच्या लग्नाचा ११ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या पोस्टमध्ये हेमंतने क्षितीचा उल्लेख पाटलीण बाई असा केला होता. त्यामुळे अभिनेता आपल्या बायकोला पाटलीण का बोलतो? असा प्रश्न अनेकांना पडला. नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत हेमंत ढोमेने याबाबतचा खुलासा केला आहे.
दिग्दर्शक म्हणाला, “माझे काका आणि माझे सगळे चुलतभाऊ त्यांचं आडनाव ढोमे-पाटील असं लावतात. कारण, आमचं मूळ आडनाव ढोमे-पाटील असंच आहे. आम्ही पिंपरखेड गावचे पाटील आहोत. माझे बाबा पोलीस खात्यात असल्याने त्यांनी कधीच पाटील आडनाव लावलं नाही. दयानंद ढोमे एवढंच नाव ते लावायचे. त्यामुळे माझंही नाव आपसूकच हेमंत ढोमे असं राहिलं.”
हेही वाचा : अमिताभ बच्चन यांनी सूनबाई ऐश्वर्या रायला इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो, सोशल मीडियावर चर्चांना उधाण
“क्षितीला जेव्हा मी भेटलो तेव्हा ती नेहमी मला सांगायची. माझी फार इच्छा आहे की, माझ्या जोडीदाराचं आडनाव मोठं पाहिजे. कारण तिचं नाव आहे क्षिती जोग…नावात अन् आडनावात दोन्हीकडे दोनचं अक्षरं आहेत. लग्नानंतर मग मी क्षितीला सांगितलं आपलं नाव ढोमे- पाटील आहे. तू आता पाटलीण झालीस. हे ऐकून ती खरंच आनंदी झाली. तिलाही वाटतंय आता आपण गावच्या पाटलीण बाई झालो. त्यामुळे घरी ती मला ‘पाटील’ अशीच हाक मारते.” असं हेमंतने सांगितलं.
दरम्यान, हेमंत ढोमे आणि क्षिती जोगच्या ‘झिम्मा २’ चित्रपटाने दोन आठवड्यांमध्ये १० कोटींहून अधिक कमाई केली आहे. यामध्ये सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरु आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.