हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटाची सध्या मराठी कलाविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला पहिला भाग देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’मध्ये रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वे या दोन अभिनेत्रींची नव्याने एन्ट्री झाली आहे. चित्रपटात शिवानीने सुचित्रा बांदेकरांची भाची ‘मनाली’, तर रिंकूने निर्मलाची सून ‘तानिया’ची भूमिका साकारली आहे. निर्मला आणि तानियामध्ये असणारं खोडकर पण जिव्हाळ्याचं नातं प्रत्येकाला आपलंस वाटतं. या ऑनस्क्रीन सासू-सुनेचे चित्रपटातील अनेक सीन्स सध्या चर्चेत आले आहेत. यासंदर्भात हेमंत ढोमेने खास पोस्ट शेअर करुन एक किस्सा सांगितला आहे.
दिग्दर्शक हेमंत ढोमे लिहितो, “‘झिम्मा २’ चित्रपटामध्ये तानिया आणि निर्मलाचा बेडरूम मधल्या भांडणाचा एक वन शॅाट प्रसंग आहे. त्यावेळी सेटवरच्या खोलीत एका कोपऱ्यात मी आपली जागा पकडून बसलो होतो. कॅमेरात दिसू नये म्हणून एका लाल बॅगेच्या मागे लपून बसलो होतो. ६ पानांचा आणि ६ मिनिटांचा सलग वन शॅाट करायला आम्हाला तर बाई एवढी मज्जा आली, एवढी मज्जा आली की, एवढी मज्जा कधीच कोणाला आली नसेल!”
हेही वाचा : ‘अस्मिता’ फेम मयुरी वाघने खरेदी केलं नवीन घर! गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत म्हणाली, “माझ्या स्वप्नांच्या…”
“माझा मित्र सत्यजीत श्रीराम आणि संपूर्ण टिमच्या मेहनतीशिवाय ही मज्जा येणं शक्य नव्हतं! त्यामुळे माझ्या संपूर्ण टिमचे खूप आभार! याशिवाय निर्मिती सावंत आणि रिंकू राजगुरु या दोघींना खूप प्रेम” असं कॅप्शन हेमंतने या पोस्टला दिलं आहे. या पोस्टसह शेअर केलेल्या फोटोमध्ये हेमंत खरंच एका ट्रॉली आणि बॅगेआड लपून बसल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : अक्षराचा जीव धोक्यात! अधिपती कशी करणार बायकोची मदत? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये येणार मोठा ट्विस्ट
दरम्यान, ‘झिम्मा २’ चित्रपटाला सध्या बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरु यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी आणि चाहत्यांना सरप्राईज म्हणून ‘झिम्मा २’चे कलाकार विविध चित्रपटगृहांना भेट देत आहेत.