मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या ‘झिम्मा २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘झिम्मा’च्या २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागात सगळ्या बायका लंडन ट्रिपला गेल्या होत्या. आता या दुसऱ्या भागात सात बायकांच्या रियुनियनची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ‘झिम्मा २’मध्ये रिंकू राजगुरू व शिवानी सुर्वे या अभिनेत्रींची नव्याने एन्ट्री झाली आहे. या दोघीही पहिल्या भागात नव्हत्या. यात रिंकूने ‘तान्या’, तर शिवानी सुर्वेने ‘मनाली’ ही भूमिका साकारली आहे. ‘झिम्मा २’ साठी शिवानीची निवड कशी झाली? याबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला आहे.
शिवानी सुर्वे मनालीच्या भूमिकेबद्दल सांगताना म्हणाली, “मी आणि हेमंतने यापूर्वी एकत्र काम केलंय. त्याला मी ‘वाळवी’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला बोलावलं होतं. तेव्हा हेमंत ‘झिम्मा २’चं कास्टिंग करतोय याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. मी अगदी सहज त्याला म्हणाले तुला वाटतंय का माझ्यात काही समस्या आहे? म्हणून तू मला तुझ्या चित्रपटात पुन्हा घेतलं नाहीस बरोबर? त्याला सुरुवातीला काही समजलंच नाही मी नेमकं काय बोलतेय. यामागचं कारण असं की, आम्ही एकत्र एक सिनेमा केला होता त्याला प्रदर्शित व्हायला तब्बल चार ते साडे चार वर्ष लागली होती.”
शिवानी पुढे म्हणाली, “मला सिनेमात घेतलं की वेळ लागतो असा काही तुझा गैरसमज झालाय का? ही घे माझी पत्रिका…यात काहीच दोष नाहीये त्यामुळे मला कास्ट कर… असं माझं आणि हेमंतचं बोलणं झालं होतं. त्याला ही गोष्ट मी अगदी गमतीत सांगितली होती.”
“दोन-चार दिवसांनी मला खरंच हेमंतचा फोन आला आणि तो मला म्हणाला, शिवानी पत्रिका कामी आली. माझ्या चित्रपटात अशी एक भूमिका आहे तू करशील का? अर्थात गमतीचा भाग बाजूला राहिला. मी मनालीची गंभीर भूमिका करू शकते असा त्याला विश्वास होता. हेमंतला हा विश्वास वाटणं हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. क्षिती आणि हेमंतचं ‘झिम्मा’ या विषयावर खूप जास्त प्रेम आहे त्यामुळे त्यांना जवळच्या वाटणाऱ्या चित्रपटात त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.” असं शिवानी सुर्वेने सांगितलं.