चित्रपट, मालिका, वेब सीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. लवकरच तो ‘झिम्मा २’ चित्रपटामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. मध्यंतरी तो वैयक्तिक आयुष्यातील एका सकारात्मक प्रसंगामुळे चर्चेत आला होता. अभिनेत्याने बायको मितालीच्या साथीने आईचं दुसरं लग्न लावण्यासाठी पुढाकार घेतला होता. याचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सिद्धार्थ चांदेकरने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’शी संवाद साधताना भाष्य केलं.
‘झिम्मा २’च्या ट्रेलरमधील “माझा बाबा गेल्यावर माझ्या आईला एखाद्या पार्टनरची गरज असेल याचा मी कधीच विचार केला नाही.” हा संवाद सर्वाचं लक्ष वेधून घेतो. खऱ्या आयुष्यात सुद्धा सिद्धार्थ त्याच भूमिकेतून जात होता. त्यामुळे ऑनस्क्रीन आणि खरं आयुष्य यांचा मेळ कसा जुळून आला याबद्दल सिद्धार्थ चांदेकर खुलासा केला आहे.
सिद्धार्थ ‘झिम्मा २’मधील संवाद आणि आईबरोबरच्या नात्याविषयी सांगताना म्हणाला, “मला जेव्हा पहिल्यांदा समजलं की, या चित्रपटाचं कथानक सुद्धा असंच काहीसं आहे. तेव्हा मला खरंच आश्चर्य वाटलं होतं. कारण, ज्यावेळी मी स्क्रिप्ट वाचायला घेतली तेव्हा मला तो प्रसंग किंवा संवाद मूळ चित्रपटात असेल याबद्दल काहीच कल्पना नव्हती. या सगळ्या गोष्टी अचानक जुळून आल्या. खऱ्या आयुष्यात आईला जोडीदाराची गरज भासू शकते याचा आपण खरंच विचार करत नाही. पण, माझ्या डोक्यात या गोष्टी एक ते दीड वर्षांपासून सुरू होत्या.”
“सिनेमातील तो संवाद पहिल्यांदा ऐकल्यावर मी लगेच त्या दोघांनाही (हेमंत-क्षिती) माझ्या डोक्यात नेमका काय विचार चालू आहेत याबद्दल सांगितलं. आई आणि मी नेमका काय विचार करतोय ते सुद्धा मी हेमंत-क्षितीला सांगितलं. तो अनुभव फारच वेगळा आहे. आयुष्यात मी भले काहीच चांगलं केलं नसेन पण, हा निर्णय घेऊन मी खरंच एकतरी चांगलं काम केलं असं म्हणायला हरकत नाही.”
हेही वाचा : सायली अर्जुनला देणार चक्क डिनर डेटचं सरप्राईज! ‘ठरलं तर मग’ मध्ये येणार ‘असा’ ट्विस्ट, नवीन प्रोमो आला समोर…
सिद्धार्थबद्दल सांगताना हेमंत ढोमे म्हणाला, “तो पंधरा वर्षांचा होता तेव्हापासून मी सगळं पाहिलंय. त्याचा संघर्ष…सिद्धार्थचं त्याच्या आईबरोबर असणारं नातं, बहिणीचं लग्न इथून सुरू झालेला तो प्रवास मी जवळून पाहिलाय. त्याने आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी केल्याचं फळ आता त्याला मिळतंय. मला चांगलं आठवतंय, आईचं लग्न आहे ही गोष्ट आम्हाला सगळ्यांना त्याने एकत्र बसवून सांगितली होती, तेव्हा खरंच खूप भारी वाटलं होतं आणि आम्हाला सगळ्यांना सिद्धार्थचा खूप अभिमान वाटतो.”
दरम्यान,बहुचर्चित ‘झिम्मा २’मध्ये चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरसह सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, रिंकू राजगुरू, सायली संजीव, शिवानी सुर्वे, क्षिती जोग या कलाकरांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.