Jhimma 2 Review: “बाईपणाची व्याख्या जी मोडून काढते ती खरी बाई.” या डायलॉगप्रमाणेच हेमंत ढोमे यांच्या ‘झिम्मा २’ने यशस्वी चित्रपटांची व्याख्याच मोडून काढत एक वेगळा मापदंडच मराठी चित्रपटसृष्टीसाठी घालून दिला आहे असं म्हंटलं तरी ती अतिशयोक्ति ठरणार नाही. २०२१ मध्ये कोविड काळात प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला, जे हिंदी चित्रपटांना जमत नव्हतं ती कमाल एकट्या मराठी चित्रपटाने करून दाखवली होती. त्यामुळेच निश्चितच याच्या दुसऱ्या भागाच्या घोषणेपासूनच याची हवा होणार होणं स्वाभाविक आहे.
२५ ते ६० वर्षं अशा वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रिया एका लेडीज स्पेशल टूरने लंडनला फिरायला जातात अन् त्या टूरवर त्यांची होणारी घट्ट मैत्री ही गोष्ट आपण पहिल्या भागात अनुभवली आहेच. त्याच ७ स्त्रियांचं पुन्हा एका नव्या ट्रीपवर होणारं रियुनियन. त्यात दोन नव्या मुलींची भर, त्या स्त्रियांच्या खासगी आयुष्यात झालेले बदल, प्रॉब्लेम आणि ते सगळं बाजूला सारुन एकमेकींच्या पाठी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या या धमाल ग्रुपची एक नवी गोष्ट या ‘झिम्मा २’मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहिल्याप्रमाणेच दुसऱ्या भागाचाही साचा ठरलेलाच आहे, पण या दुसऱ्या भागात मानवी भावनांवर जास्त भर दिल्याने हा भाग अधिक जवळचा वाटतो अन् तो मनाला भिडतोसुद्धा.
आणखी वाचा : The Railway Men Review: भोपाळ दुर्घटनेवर बेतलेली आटोपशीर, अभ्यासपूर्ण अन् अस्वस्थ करणारी दर्जेदार सीरिज
इंदुमती कर्णिक म्हणजेच लाडक्या इंदु डार्लिंगच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या मैत्रिणी म्हणजेच मिता. कृतिका, वैशाली, आणि निर्मला या पुन्हा एकत्र जमतात खऱ्या पण प्रत्येकीच्या खासगी आयुष्यातील व्याप काही कमी झाल्याचं दिसत नाही. तेच व्याप मागे सारून त्या सगळ्या ही ट्रीप मनसोक्त एंजॉय करतात का? ही ट्रीप एंजॉय करत असताना एकमेकींबद्दलच्या कोणत्या गोष्टी त्यांना नव्याने उमगतात? या ग्रुपमध्ये नव्या आलेल्या दोन मुलींशीही त्यांची तितकीच घट्ट मैत्री होते का? अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हा चित्रपट पाहताना मिळतील. आधी म्हटलं त्याप्रमाणे ‘झिम्मा २’ हा पहिल्या भागापेक्षा अधिक इमोशनल आहे कारण यामध्ये स्त्रियाच किती ग्रेट आहेत हा दाखवण्याचा अट्टहास नाहीये, अन् केवळ तसं न करता मानवी भावनांचे वेगवेगळे पैलू या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर उलगडले जातात अन् ते पाहताना आपण भावुक होतो. हीच गोष्ट हेमंत ढोमे यांनी त्याच्या कथेचा केंद्रबिंदू ठेवल्याने ती कुठेही भरकटत नाही. सध्या ज्या प्रकारचे स्त्रीविषयक चित्रपट आणि सीरिज आपल्याला हिंदीत पाहायला मिळत आहेत त्याच्या फार पलीकडे गेलेला हा ‘झिम्मा २’ खऱ्या अर्थाने फॉरवर्ड आहे असंच म्हणायला लागेल.

सात बायकांची गोष्ट असूनही त्यात कुठेही पुरुषांना कमी लेखलेलं नाही की समाजाला बोल लावलेले नाही की पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाने बोटं मोडलेली नाहीत. ही गोष्ट पटकथा व संवाद लिहिणाऱ्या इरावती कर्णिक यांनी अगदी बरोबर सांभाळली आहे. अर्थात ‘झिम्मा’च्या पहिल्या भागातही ही गोष्ट नव्हतीच, परंतु दुसऱ्या भागातही या गोष्टी कटाक्षाने टाळून चित्रपटाचा आत्मा जपल्याने हा चित्रपट आणखी भावतो. याबरोबरच चित्रपटात एका गंभीर आजारावर ज्यापद्धतीने भाष्य करण्यात आलं आहे ते मनाला स्पर्शून जाणारं आणि अस्वस्थ करणारं आहे. शिवाय आयुष्यात तुमच्याबरोबर तुमचा जोडीदार, हक्काचा माणूस किंवा एखादी मित्र मैत्रीण असणं हे किती महत्त्वाचं आहे हेदेखील या दुसऱ्या भागात उत्तमरित्या अधोरेखित करण्यात आलं आहे. कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता, प्रोग्रेसिव्ह असल्याचा आव न आणता स्त्रियांच्या आयुष्यातील समस्या आणि त्या स्वतःच त्यावर कशापद्धतीने उपाय काढतात अन् यासाठी त्या एकमेकींच्या मागे खंबीरपणे कशा उभ्या राहतात हेच या चित्रपटातून अत्यंत संयतरित्या मांडलं गेलं आहे जी या चित्रपटाची भक्कम बाजू आहे.
सत्यजीत श्रीराम यांची सिनेमॅटोग्राफी फार उत्तम जमून आली आहे. अमितराज यांनी दिलेलं संगीत चित्रपटात एक वेगळीच जान आणतं. ‘पुन्हा झिम्मा’ आणि ‘मराठी पोरी’ ही दोन गाणी तर तुमच्या लक्षात राहतील अशीच आहेत. याबरोबरच चित्रपटातील काही सीन्स तुमच्या डोळ्यात नक्की पाणी आणतील. खासकरून सिद्धार्थ चांदेकर व सुहास जोशी यांच्यातील एक सीन पाहताना तुम्हाला हुंदके आवरणार नाहीत. क्षिती जोगचं मिता हे पात्र आपल्या जुन्या मित्राला भेटून आल्यावर आपल्या मुलीशी फोनवर बोलताना जसं भावुक होतं तो सीन काळजाला हात घालणारा आहे. असं असलं तरी चित्रपटात विनोदाची कमतरता अजिबात नाही. अर्थात निर्मिती सावंत यांच्यासारखी ताकदीची अभिनेत्री असताना ती उणीव भासणारच नाही. बाकी सुहास जोशी, सायली संजीव, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, सिद्धार्थ चांदेकर यांची कामंही तितकीच चोख झाली आहेत. या भागात खासकरून सुहास जोशी यांचं इंदु आणि क्षिती जोग हीचं मिता हे पात्र तुमच्या मनात घर करेल हे नक्की.
या सगळ्या गोष्टी जमवून आणणाऱ्या ‘कॅप्टन ऑफ द शिप’ म्हणजेच हेमंत ढोमे यांचंही कौतुक करावं तितकं कमीच आहे. अतिशय उत्तम कथा, तितकीच खिळवून ठेवणारी पटकथा आणि कुठेही लोकांना शिकवण देण्याचा आव न आणता एक धमाल, रंजक आणि तितकीच साधी पण विचार करायला लावणारी गोष्ट त्यांनी या ‘झिम्मा २’मधून सादर केलेली आहे. राजकुमार हिरानी व झोया अख्तरसारखे काही हातावर मोजणारे दिग्दर्शक आहेत जे मानवी भावनांचं अचूक चित्रण त्यांच्या चित्रपटात करतात अन् आता याच यादीत हेमंत ढोमे हे नावदेखील आवर्जून घ्यायलाच हवं. दर्जेदार, मनोरंजक अन् हसता हसता डोळ्यात पाणी आणणाऱ्या एका अनोख्या मराठी कलाकृतीचा आस्वाद घ्यायचा असेल तर ‘झिम्मा २’ सगळ्यांनीच चित्रपटगृहात सहकुटुंब, मित्रपरिवारासह अवश्य पाहायलाच हवा.