हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटानंतर आता लवकरच ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. येत्या २४ नोव्हेंबरला ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी वैशाली हे पात्र साकारलं होतं. नुकतंच त्यांनी या चित्रपटात त्यांची निवड कशी झाली, याचा किस्सा सांगितला आहे.
‘झिम्मा २’ या चित्रपटातील सर्व कलाकार हे सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतंच सुचित्रा बांदेकर यांनी ‘रत्न मराठी मीडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी झिम्मा हा चित्रपट कसा मिळाला, याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : Jhimma 2 Review: जीवाभावाच्या मैत्रिणींच्या रियुनियनची भावुक करणारी गोष्ट; वाचा कसा आहे ‘झिम्मा २’
सुचित्रा बांदेकर काय म्हणाल्या?
“मला क्षितीचा फोन आला होता. हेमंत ढोमेने मला फोन केला नव्हता. क्षिती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. त्यावेळी मी परदेशात होते. तिने मला मी एका चित्रपटाची निर्मिती करतेय, असे सांगितले. मी तिचे अभिनंदन केले. त्यावेळी तिने मला तू यात काम करावं, अशी माझी इच्छा आहे, असे सांगितलं.
मी तेव्हा तिला सध्या मी परदेशात आहे, आपण आल्यावर बोलू. पण तुझा चित्रपट आहे, मग मी नक्की करतेय. त्यावेळी मी या चित्रपटातील भूमिकाही ऐकली नव्हती. माझं पात्रही मला माहिती नव्हतं.
कोणत्या तरी एका अभिनेत्रीला समस्या निर्माण झाली, त्यामुळे मग क्षितीने मला आपली जवळची मैत्रीण आणि फोन केल्यावर नाही म्हणणार नाही, या विश्वासावर तिने झिम्मा १ साठी मला फोन केला. त्यामुळे मग झिम्मा १ ने माझी निवड केली आहे, असं मला वाटतं”, असे सुचित्रा बांदेकर म्हणाल्या.
आणखी वाचा : Video : “…म्हणून ‘झिम्मा २’मध्ये सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले नाही”, हेमंत ढोमेने सांगितलं खरं कारण
दरम्यान ‘झिम्मा १’ हा चित्रपट करोना काळानंतर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होत आहे. ‘झिम्मा २’ या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर असे दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत.