हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून सात बायकांच्या रियुनियनची गोष्ट चांगलीच पसंतीस उतरली आहे. सामान्य माणसांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत प्रत्येकजण ‘झिम्मा २’ चं कौतुक करत आहे. अशातच या चित्रपटात सात अभिनेत्रींबरोबर महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ चांदेकरने खास पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने ‘झिम्मा २’ चित्रपटात कबीर हे पात्र साकारलं आहे. कबीर इंदू डार्लिंगच्या वाढदिवसानिमित्त या सात बायकांचं रियुनियन घडवून आणतो. चित्रपटाला मिळणारा दमदार प्रतिसाद आणि यामधील प्रत्येक अभिनेत्रीचं कौतुक करण्यासाठी सिद्धार्थने खास पोस्ट लिहिली आहे. तसेच शूटिंगदरम्यान काढलेले या अभिनेत्रींचे सुंदर, Unseen फोटो सुद्धा अभिनेत्याने या पोस्टबरोबर शेअर केले आहेत.
हेही वाचा : ठरलं तर मग : संतापलेल्या अर्जुनला सायली ‘असा’ देणार धीर, मालिकेत बहरणार दोघांचं नातं, पाहा प्रोमो
सिद्धार्थ पोस्टमध्ये लिहितो, “काय कमाल आहे ना बायकांची? एवढं हसायला आणि हसवायला शिकतात कुठून? मनापासून प्रेम करायला, मनापासून काळजी घ्यायला, मनापासून जगायला ते ‘मन’ किती शक्तिशाली असेल याची कल्पना करणं सुद्धा अवघडच. संकटाच्या, दुःखाच्या काळात डोळ्यात डोळे घालून शांतपणे हसून बघायला काय ताकद लागत असेल आणि एवढं असून सुद्धा लहान बाळासारखं हट्ट करायला पण मागे पुढे बघत नाहीत. अजब आहात तुम्ही खरंच… काय कमाल आहे ना बायकांची? यांचं सौंदर्य एका फोटोत कधीच दाखवता यायचं नाही…त्यांचं हास्य दाखवण्याचा हा माझा बारीक प्रयत्न.”
हेही वाचा : आदिनाथ कोठारे चाहत्यांना देणार खास सरप्राईज! पोस्ट शेअर करत म्हणाला, “१ डिसेंबरला…”
सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोंमध्ये या चित्रपटातील प्रत्येक अभिनेत्रींचे हसतमुख चेहरे पाहायला मिळत आहे. ‘झिम्मा २’ मध्ये सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत, सायली संजीव, शिवानी सुर्वे, सुहास जोशी, रिंकू राजगुरू आणि क्षिती जोग या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’च्या पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागाला सुद्धा प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ६ कोटींहून अधिक कमाई केली आहे.