Jhimma2 Trailer : ‘झिम्मा’ चित्रपटाचा पहिला भाग २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘झिम्मा’च्या यशानंतर प्रेक्षकांच्या मनात ‘झिम्मा २’ बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक हेमंत ढोमेने सात बायकांच्या पुढच्या ट्रिपची अर्थात ‘झिम्मा २’ ची घोषणा केली होती. अखेर टीझरनंतर आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झिम्मा २’मध्ये सगळ्या बायका इंदू डार्लिंगच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ट्रिपसाठी निघाल्या आहेत. इंदूचा वाढदिवस कसा व कुठे साजरा करायचा याची संपूर्ण जबाबदारी कबीरवर असणार आहे. कबीरची भूमिका अभिनेता सिद्धार्थ चांदेकर साकारत आहे. ट्रेलरच्या सुरूवातीला प्रेक्षकांना अभिनेत्री निर्मिती सावंत गाडी चालवत असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर निर्मिती आणि सुचित्राला एक पोलीस अधिकारी पकडतो आणि बायकांचा नवा खेळ सुरू होतो.

यंदाच्या खेळात रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोन नव्या अभिनेत्री पाहायला मिळत आहे. या सात बायकांची गोष्ट प्रेक्षकांना २४ नोव्हेंबरपासून मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. इंदू डार्लिंगच्या ७५ व्या वाढदिवसाशिवाय चित्रपटात अनेक गोष्टींवर भाष्य करण्यात आलं आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ : लक्ष्मीपूजनाला सुभेदारांच्या घरी येणार प्रतिमा, सायलीला लागणार आईची चाहूल, पाहा प्रोमो…

‘झिम्मा २’च्या ट्रेलरमधील बरेच संवाद लक्ष वेधून घेतात. “फक्त आई होणं म्हणजे, बाई होणं नसतं बाळा…”, “मला आयुष्यात रोमान्सही नकोय…”, “बाबा गेल्यावर माझ्या आईला एखाद्या पार्टनरची गरज असेल याचा मी कधीच विचार केला नाही.”, “जोपर्यंत जिवात जीव आहे तोपर्यंत पुरेपूर जगून घेणार!” त्यामुळे ट्रिपशिवाय चित्रपटात अनेक सामाजिक समस्यांवर प्रकाशझोत टाकल्याचं ट्रेलर पाहून लक्षात येत आहे.

दरम्यान, ‘झिम्मा २’ मध्ये प्रेक्षकांना सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर असे दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jhimma 2 trailer out now director hemant dhome and siddharth chandekar shared trailer sva 00