मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण चालू आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालावत असल्याने राज्यभरातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठवाड्यातील बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये सोमवारी (३० ऑक्टोबर) या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर आता अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेने प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : सोनाली कुलकर्णीच्या आई-वडिलांचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण: झळकणार ‘या’ चित्रपटात
सोशल मीडियावर ट्वीट शेअर करत झिम्मा चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेने आपलं मत मांडलं आहे. “आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेतंय…मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय… त्यांच्या न्याय मागणीचा विचार झाला पाहिजे! सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत शिवरायांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र अशांत होता कामा नये! जय शिवराय!” असं ट्वीट त्याने केलं आहे.
हेमंत ढोमेप्रमाणे मनोरंजनसृष्टीतील कलाकार किरण माने, अश्विनी महांगडे, रितेश देशमुख यांनी सुद्धा मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंच्या उपोषणासंदर्भात भाष्य केलं आहे. याशिवाय अश्विनी महांगडेने मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण करणाऱ्या आंदोलकांची भेट घेतली आहे. आंदोलकांची भेट घेऊन अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर “आता नाही तर कधीच नाही…” अशी पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा : बॉलीवूडचे यशस्वी कलाकार कोण आहेत? शेफाली शाहने मांडलं मत; म्हणाली, “माझ्या मते…”
दरम्यान, अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे नेहमीच सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत असतो. यापूर्वी हेमंतने मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती यासंदर्भात केलेल्या पोस्ट सोशल मीडियावर बऱ्याच व्हायरल झाल्या होत्या.