दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ‘बिग बजेट’ ऐतिहासिक चित्रपटाची सध्या सातत्याने चर्चा सुरु आहे. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. या चित्रपटातील कलाकारांवर अनेक राजकीय नेत्यांकडून आक्षेप घेतला जात आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी या ऐतिहासिक चित्रपटावर टीका केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटांवर आक्षेप घेतला आहे. ‘गुळगुळीत चेहऱ्याचा मावळा तुम्हाला तरी पटतो का?’ असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केले आहे. या चित्रपटाच्या कास्टिंगवर अनेकांनी निशाणा साधला आहे. यातील भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना कडाडून विरोध केला जात आहे. नुकतीच जितेंद्र आव्हाडांनी याबद्दल अप्रत्यक्ष टीका केली आहे.
आणखी वाचा : “मी २०१८ पासूनच निश्चित होतो कारण…” महेश मांजरेकरांच्या लेकाने सांगितला पडद्यामागचा किस्सा

ठाण्यातील विवियाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याबद्दल भाष्य केलं.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

“महाराष्ट्रात विकृती पसरवली जाऊ नये हीच आमची इच्छा आहे. जे कोणी मावळे दाखवले गेले आहेत ते राकट असायला हवेत. देह सौंदर्य हा चित्रपटसृष्टीतील अविभाज्य घटक आहे. ते देह सौंदर्य साकारत असताना आपण ती भूमिका कोणाला साकारायला देतो आणि त्यातून पुढे मेसेज काय जाणार आहे हे फार महत्त्वाचे आहे.

तुम्ही जर एखादा मावळा लुळा, पांगळा, असा बारीक दाखवला तर तो मावळा होऊच शकत नाही. अक्षय कुमारला आमचा विरोध नाही. पण त्याच्या आताच्या वयाअगोदरच महाराजांचे निधन झाले होते. महाराजांच्या सर्व लढाई १६ ते ४६ या वयात लढल्या होत्या. मग या वयात अक्षय कुमार कसा काय बसू शकतो का? तर नाही बसू शकत. मग चित्रपटाला हाईप द्यायची तर कशी द्यायची? अशी विकृती करुन हाईप मिळत नाही.

महाराष्ट्रात आधीच चित्रपट बंद पडले आहेत. शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मांडीवर झोपवलं आहे हे तुम्हाला तरी पटत का? बाजीप्रभू देशपांडे म्हणतात की मला शिवाजी महाराजांशी लढायचं हे तुम्हाला तरी पटत का? गुळगुळीत चेहऱ्याचा मावळा तुम्हाला पटतो का? या प्रश्नांची उत्तर मला द्या.

ऐतिहासिक चित्रपटांचे संदर्भ तपासले गेले पाहिजेत. बाजीप्रभू आणि शिवाजी महाराजांची लढाई याला ऐतिहासिक संदर्भ काय? काही तरी ऐतिहासिक संदर्भ असेल ना… तुम्ही उद्या काहीही दाखवाल की जिजाऊ आणि शिवाजी महाराजांचं भांडण झालं होतं, असंही उद्या दाखवाल. पण जे घडलं नाही, जे इतिहासात कोणी वाचलेलं नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास हा नोंदलेला इतिहास आहे. त्यावेळी इतिहासकारांनी नोंदी केलेल्या आहेत. त्या कुठे तरी नोंदींमध्ये सापडायला हव्यात ना…??” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आणखी वाचा : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये ऐतिहासिक भूमिकेत झळकणारा सत्य मांजरेकर नेमका आहे तरी कोण?

दरम्यान ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या चित्रपटात ७ प्रसिद्ध मराठी अभिनेते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे, नवाब शहा हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad comment on har har mahadev and vedat marathe veer daudale saat nrp
Show comments