आई-वडील नेहमीच मुलांच्या भविष्याची चिंता करतात पण, मुलं म्हातारपणी आपल्या पालकांची काळजी करतात का? पोटच्या मुलावरच आईच्या मृत्यूचा आरोप गोविंद पाठक यांनी लावला असून आता या प्रकरणाचा निकाल काय लागणार, याचं उत्तर प्रेक्षकांना ‘जुनं फर्निचर’ चित्रपट पाहूनच मिळणार आहे. याच निमित्ताने महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सचिन खेडेकर, अनुषा दांडेकर, भूषण प्रधान या संपूर्ण टीमने लोकसत्ता अड्डाला उपस्थिती लावली होती.
लोकसत्ता अड्डाला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकरांनी सांगितलं की, या चित्रपटाचं कथानक त्यांना दहा वर्षांपूर्वीच सुचलं होतं. ते म्हणाले, “जुनं फर्निचर’ हा सिनेमा पालकांना चुकीची वागणूक देणाऱ्या मुलांसाठी नाही. हा सिनेमा पालकांना गृहीत धरणाऱ्या मुलांसाठी आहे. माझी आई गेल्यावर मी तिला किती गृहित धरलं होतं हे माझ्या लक्षात आलं.”
हेही वाचा : Video : केसात गजरा, गुलाबी साडी अन्…; नम्रता संभेरावचा लोकप्रिय गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
“आई गेल्यावर या सगळ्या गोष्टी मला जाणवू लागल्या. त्यातून ही गोष्ट सुचली. पण, ही गोष्ट मी ऑनपेपर लिहून ठेवली नव्हती. अनेकांना मी माझी संकल्पना ऐकवली…बऱ्याच जणांनी सांगितलं अरे लिही पण, कधी लिहिणं झालं नाही. आयुष्यात एक ट्रिगर पॉईंट येतो तेव्हा आपण गोष्टी करतो. ती घटना घडली आणि मी गोष्ट लिहायला घेतली. ही संपूर्ण कथा मी माझ्या अनुभवातून लिहिली आहे. आई-वडील असताना आपल्याला जाणीव होत नाही पण, ते गेल्यावर आपल्याला खूप किंमत कळते आणि सॉरी बोलायला ते आपल्याजवळ नसतात.” अशी भावुक आठवण महेश मांजरेकरांनी सांगितली.
हेही वाचा : विकी कौशलच्या ‘छावा’मध्ये झळकणार मराठमोळा संतोष जुवेकर! अनुभव सांगत म्हणाला, “सिनेमाचा ट्रेलर येईल तेव्हा…”
दरम्यान, जुनं फर्निचर चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सचिन खेडेकर, अनुषा दांडेकर, भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.