हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. २०२१ मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर प्रेक्षकांच्या मनात दुसऱ्या भागाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर ‘झिम्मा २’ येत्या २४ नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
लॉकडाऊननंतर मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या ‘झिम्मा’ चित्रपटाचा करण जोहर हिंदी रिमेक बनवणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे. यावर आता लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘झिम्मा’च्या हिंदी रिमेकबद्दल हेमंत-क्षितीचं नेमकं मत काय आहे जाणून घेऊया…
‘झिम्मा’च्या हिंदी रिमेकबद्दल हेमंत ढोमे म्हणाला, “खरं सांगू का? ही चर्चा खरंच चालू आहे…मी स्पष्टपणे नकार देणार नाही. क्षिती आणि करण सरांनी मिळून आताच एक चित्रपट केला. त्याकाळात त्या दोघांची सुद्धा या कथेवर बरीच चर्चा झाली. त्यांची चर्चा सुरू असताना हिंदी रिमेकचे कलाकार सुद्धा निश्चित झाले आहेत असंही पसरलं पण, कलाकार कोण असतील हे अद्याप ठरलेलं नाही. यापेक्षा जास्त मी आता काहीच सांगू शकणार नाही.”
क्षिती जोगने पुढे सांगितलं, “एवढ्या लगेच हा चित्रपट हिंदीत बनवला जाणार नाही. सध्या फक्त चर्चा चालू आहे. २०२४ मध्ये वगैरे हिंदी रिमेक प्रदर्शित होईल असंही काही नाहीये. ही बायकांची गोष्ट असल्याने मी कधीच हा चित्रपटाच्या रिमेकला विरोध करणार नाही. सगळ्या भाषेत चित्रपट झाला पाहिजे फक्त आमची पात्र त्यांना तेवढ्याच प्रामाणिकपणे मांडता आली पाहिजेत. तो प्रामाणिकपणा जपला, तर या सिनेमातील कलाकार आणि याची निर्माती म्हणून मला सर्वात जास्त आनंद होईल.”
दरम्यान, बहुचर्चित झिम्माचा २ भाग येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, सुहास जोशी, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत, सायली संजीव हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.