मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत अंबर-शिवानी, अंकिता-कुणाल, दिव्या पुगावकर असे बरेच मराठी कलाकार लग्नबंधनात अडकून एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. या कलाकारांपाठोपाठ काही दिवसांआधीच मराठी सिनेविश्वातील एका लोकप्रिय गायकाने लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं होतं. हा गायक म्हणजे कार्तिकी गायकवाडचा ( Kartiki Gaikwad ) भाऊ कौस्तुभ. लग्न ठरल्यावर आपल्या होणाऱ्या पत्नीसह त्याने फोटो शेअर केले होते. आता नुकताच कौस्तुभ गायकवाडचा साखरपुडा पार पडला आहे.
कौस्तुभ गायकवाडचा साखरपुडा नुकताच पार पडला असून कार्तिकीने याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच भावाला शुभेच्छा देत गायिका लिहिते, “तुम्हाला साखरपुड्याच्या आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. दोघंही असेच कायम आनंदी राहा, तुम्हा दोघांना खूप प्रेम”
कौस्तुभ गायकवाडच्या साखरपुड्याचे फोटो
कार्तिकीने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये कौस्तुभ आणि त्याच्या पत्नीने पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. तर, दुसऱ्या एका फोटोत या जोडप्याने इंडो-वेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. या समारंभात कौस्तुभने आपल्या होणाऱ्या पत्नीला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. याची झलक सुद्धा कार्तिकीच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोमधून कार्तिकी गायकवाड ( Kartiki Gaikwad ) घराघरांत लोकप्रिय झाली. ती पहिल्या पर्वाची विजेती ठरली होती. कार्तिकीला आपल्या घरातच गायनाचा वारसा लाभलेला आहे. तिचा भाऊ कौस्तुभ गायकवाड सुद्धा मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. काही चित्रपटांसाठी त्याने पार्श्वगायन केलेलं आहे. याशिवाय कार्तिकी, तिचे वडील व भाऊ मिळून गाण्यांचे अनेक शोज देखील करतात.
गायकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्याने २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉईज’ चित्रपटातलं ‘लग्नाळू’ हे गाणं गायलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड गाजलं. आजही प्रत्येक समारंभात हे गाणं वाजवलं जातं. याशिवाय कौस्तुभने अनेक अभंग देखील गायले आहेत.