Kartiki Gaikwad Brother Wedding : झी मराठी वहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. ‘सारेगमप’ या शोमुळे कार्तिकीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाची ती विजेतीही झाली होती. कार्तिकीने आजवर अनेक गाणी गायली आहेत. शिवाय मराठी मालिकांसाठीच्या शीर्षकगीतेही तिने गायली आहेत. कार्तिकीसह तिचा भाऊ कौस्तुभ हादेखील एक लोकप्रिय गायक आहे.

कौस्तुभने काही चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलेलं आहे. सध्या कौस्तुभ त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका खास गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. ते म्हणजे कौस्तुभ लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपुर्वी होणाऱ्या पत्नीसह फोटो शेअर करत गायकाने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. “Officially Engaged! Yes to forever असं म्हणत त्याने होणाऱ्या पत्नीबरोबरचे फोटो शेअर केले होते.

अशातच कौस्तुभच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. लग्नाआधीचा घाणा भरण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. याचे काही खास क्षण कार्तिकीने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. यावेळी कार्तिकीने गाणंही गायलं. कार्तिकीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती गाणं गात आहे, तर महिला जात्यावर हळद दळताना दिसत आहेत. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट्स करत तिच्या गाण्याचं कौतुक केलं आहे.

या वर्षीच्या जानेवारी महिन्यात कौस्तुभचा कुंकुम तिलक कार्यक्रम पार पडला होता. तेव्हापासून त्याच्या लग्नाविषयीच्या चर्चा सुरू आहेत आणि आता तो लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान, कौस्तुभसुद्धा मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. ‘बॉईज’ या चित्रपटातलं ‘लग्नाळू’ हे गाणं कौस्तुभने गायलं आहे. शिवाय तो वडिलांबरोबर गायनाचे कार्यक्रमही करतो.

दरम्यान, कौस्तुभच्या होणाऱ्या पत्नीचं नाव काव्या असं आहे. येत्या १ मे २०२५ रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. याबद्दल स्वत: कौस्तुभने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. कौस्तुभने काव्याबरोबरचे प्री-वेडिंगचे खास फोटो शेअर केले आहेत. कौस्तुभने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.