‘चार दिवस सासूचे’ या मालिकेने एकेकाळी छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवलं होतं. दहा वर्षांहून अधिक काळ ही मालिका छोट्या पडद्यावर चालू होती. यामुळे रोहिणी हट्टंगडी यांच्यासह अभिनेत्री कविता लाड-मेढेकर या घराघरांत लोकप्रिय झाल्या. सध्या कविता भुवनेश्वरीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
मनोरंजन सृष्टीतील बहुआयामी अभिनेत्रींपैकी एक म्हणून त्यांना ओळखलं जातं. कविता यांनी आजवर अनेक चित्रपट, मालिका व नाटकांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत खलनायिका भुवनेश्वरीची भूमिका साकारत आहेत. याशिवाय नुकत्याच पार पडलेल्या ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’ सोहळ्याला सुद्धा त्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यानची खास आठवण त्यांनी सांगितली.
हेही वाचा : जया बच्चन यांनी बिग बी यांच्याबरोबरच्या नात्याबाबत केला खुलासा, नातीच्या शोमध्ये म्हणाल्या, “माझे पती…”
कविता म्हणाल्या, “नाटक ही माझी सगळ्यात आवडती कला आहे. रंगभूमीमुळे माझ्या मनात अभिनयाची एक वेगळी गोडी निर्माण झाली. मधल्या काळात माझ्या पहिल्या मुलाच्या वेळी गरोदर असताना रंगमंचावर घडलेला एक प्रसंग माझ्या आजही लक्षात आहे. अर्थात गरोदर राहिल्यावर मी थोडे महिने नाटकातून ब्रेक घेतला होता. मातृत्व अनुभवण्यासाठी मी थोडावेळ ब्रेक घ्यायचं ठरवलं होतं. तेव्हा आमचे निर्माते सुधीर भट यांना मी याबद्दल सांगितलं. ‘मी आता नाटक सोडतेय त्यामुळे तुम्ही प्लीज लवकर रिप्लेसमेंट बघा असं मी त्यांना कळवलं.”
हेही वाचा : प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास
कविता पुढे म्हणाल्या, “मला तिसरा महिना लागला, चौथा लागला तोपर्यंत नवीन आलेल्या मुलीची रिहर्सल सुरू होती. शेवटी मी एकेदिवशी सुधीर काकांना सांगितलं, ‘आता मला जमत नाहीये…आता पाचवा महिना लागतोय आपण थांबूया.’ बघता बघता पाचव्या महिन्यात चिंचवडला ‘एका लग्नाची गोष्ट’चा शेवटचा प्रयोग करायचं ठरलं. मनात एकच विचार होता आता मी विश्रांती घेणार..आराम करणार…एकंदर मनात मी आनंदी होते पण, पुन्हा काम करणार नाही याची घालमेल सुद्ध होती.”
“शेवटच्या प्रयोगाला तिसरी घंटा झाली अन् तेव्हाच माझी एन्ट्री होती. त्यावेळी माझ्या मनात विचार आला की, आज मी एन्ट्री घेतेय ही माझी शेवटची एन्ट्री आहे यानंतर मी पुन्हा कधी रंगभूमीवर येणार? याची मला काहीच कल्पनाच नाही. नाटक सुरू झाल्यावर प्रत्येक वाक्यानंतर ‘हे शेवटचं…हे शेवटचं’ असं चक्र माझ्या डोक्यात चालू होतं. प्रशांत, मंदा देसाई या सगळ्यांना माझ्या भावना कळून चुकल्या होत्या. तो प्रयोग संपला पडदा पडला आणि मला एवढं रडू फुटलं की मी सांगूही शकत नाही. बरं मी का रडतेय याचं कारणही मला कळत नव्हतं. नाटक सोडणार म्हणून रडतेय की पुढे काय होणार या विचाराने रडतेय मला काहीच समजलं नाही. त्या प्रसंगानंतर आता पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी त्याच नाटकात म्हणजेच ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’मध्ये मी मनी म्हणून पुन्हा एन्ट्री घेतली. शिवाजी मंदिरचा पहिला प्रयोग माझी प्रेक्षकांमधून एन्ट्री झाली अन् त्या क्षणाला वाटलं हे सगळे प्रेक्षक आपले आहेत…ते आपल्या बाजूने आहेत. तो क्षण मी कधीच विसरणार नाही.” अशी भावुक व अविस्मरणीय आठवण कविता मेढेकरांनी सांगितली.