‘अगं बाई अरेच्चा!’, ‘जत्रा’, ‘यंदा कर्तव्य आहे’ ते अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ दिग्दर्शक केदार शिंदे यांचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करून जातो. २०२३ हे वर्ष दिग्दर्शकासाठी खऱ्या अर्थाने खास ठरलं कारण, त्यांचे ‘महाराष्ट्र शाहीर’ व ‘बाईपण भारी देवा’ असे लागोपाठ दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. यातील ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत इतिहास रचला होता.
बाईपणच्या यशानंतर प्रेक्षकांना केदार शिंदेंकडून प्रचंड अपेक्षा आहेत. त्यामुळेच नव्या वर्षात दिग्दर्शकाने काही संकल्प केले आहेत. याशिवाय २०२३ या वर्षाला उद्देशून त्यांनी खास पत्र सोशल मीडियावर लिहिलं आहे. चित्रपटाच्या यशाव्यतिरिक्त नुकतीच त्यांच्यावर ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या ‘हेड ऑफ प्रोग्रामिंग’ पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं त्यांनी या पत्रात नमूद केलेलं आहे.
केदार शिंदे यांची पोस्ट
प्रिय २०२३,
तू खूप काही देऊन चालला आहेस. आत्मविश्वास, जाणीव, जबाबदारी.. असं बरंच काही! बाबांच्या (शाहीर साबळे) जन्मशताब्दी वर्षात “महाराष्ट्र शाहीर” सिनेमा करण्याचं बळ तू दिलंस.. घराघरात असणाऱ्या स्त्रियांना सलाम करण्याची संधी “बाईपण भारी देवा” या सिनेमाच्या निमित्ताने तू दिलीस.. खूप लोकं आयुष्यात आणलीस, नको ती लोकं तूच बाजूला सारलीस.. जाता जाता “कलर्स मराठी” या वाहिनीच्या ‘हेड ऑफ प्रोग्रामिंग’ याचं आव्हान देऊन गेलास… २०२३ तुझा मी ऋणी आहे. फक्त एकच विनंती.. निघाला आहेस तर तुझ्या २०२४ या मित्राला अशीच मला साथ द्यायला सांग! खूप चांगलं आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या कलाकृती सादर करण्याचा मानस आहे, तो तडीस नेण्यासाठी त्याची सोबत लागेल..
श्री स्वामी समर्थ
केदार शिंदे
हेही वाचा : “ती गेली…” अभिनेता आस्ताद काळेच्या आईचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला…
दरम्यान, केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाविषयी सांगायचं झालं, तर या चित्रपटाने जगभरात तब्बल ९० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला मिळालेलं हे यश पाहून केदार शिंदेंसह यामधील सगळेच कलाकार भारावले आहेत.