Kedar Shinde Daughter Sana Shinde : केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमातून ‘बिग बॉस मराठी’ विजेता सूरज चव्हाण पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमातील नवनवीन गाणी सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
‘झापुक झुपूक’ सिनेमातील हे हळदीचं गाणं सध्या महाराष्ट्रात तुफान गाजताना दिसत आहे. या गाण्यात सूरज चव्हाणचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत असला तरी त्याच्याबरोबर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील काही कलाकारही थिरकताना दिसत आहेत. सध्या मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी सूरजच्या या गाण्यावर रील्स व्हिडीओ बनवून त्याला सिनेमासाठी शुभेच्छा देत आहेत.
दिग्दर्शक केदार शिंदे यांची कन्या अभिनेत्री सना शिंदे हिने देखील नुकताच ‘वाजीव दादा’ या गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. सनाने ‘वाजीव दादा’ या गाण्याच्या कोरिग्राफी टीमबरोबर भन्नाट एनर्जीसह डान्स केला आहे. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर करत सूरज व तिच्या वडिलांना ‘झापुक झुपूक’ सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सनाची जबरदस्त एनर्जी पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “यावर्षी हळदीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात हेच गाणं वाजणार…”, “कडक…”, “Ufff तू स्टार आहेस” अशा प्रतिक्रिया सनाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिली आहेत. याशिवाय क्रांती रेडकर, वैभव चव्हाण यांनी देखील कमेंट्स करत सनाच्या डान्सचं भरभरून कौतुक केलं आहे.
‘वाजीव दादा’ हे गाणं सूरज चव्हाणसह जुई भागवत, हेमंत फरांदे आणि ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामधील काही कलाकारांवर म्हणजेच जान्हवी किल्लेकर, छोटा पुढारी, वैभव चव्हाण, इरिना आणि पुरुषोत्तम पाटील यांच्यावर चित्रित केलं गेलं आहे. या गाण्याला सध्या प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. ‘वाजीव दादा’ हे गाणं गायक चंदन कांबळे आणि ज्ञानेश्वरी कांबळे यांनी गायलं आहे. तर, संगीतकार आणि लेखक खुद्द चंदन कांबळे हे आहेत. प्रत्येकालाच थिरकायला लावणारं हे गीत आहे.
दरम्यान, सूरज चव्हाणची ( Suraj Chavan Movie ) मुख्य भूमिका असलेला हा ‘झापुक झुपूक’ सिनेमा येत्या २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.