दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सध्या चित्रपटाला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने दहा दिवसात २६ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे अनेक किस्से सध्या केदार शिंदे शेअर करताना दिसत आहेत.
केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या गीताकारबद्दल सांगितले आहे. यावेळी त्यांनी चित्रपटाचे नाव आणि शेवट वेगळा होता, याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “खरंतर ऐन उन्हाळ्यात चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता…”, संजय मोने यांची पोस्ट; म्हणाले “नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”
केदार शिंदे यांची पोस्ट
बाईपण भारी देवा हे सिनेमाचं नाव नव्हतं. त्याचं working title होतं “मंगळागौर”. ते बदलण्याचा विचार जेव्हा आला तेव्हा, अजित भुरे यांनी सुचवलं की, गाण्याची catch line जी आहे ती ठेवली तर?
बाईपण भारी देवा याचं credit पुर्ण वलय मुलगुंड या गीतकाराचं आहे. ते गाणं त्याने फारच अप्रतिम लिहिलं आहे. स्त्री केंद्रस्थानी ठेवून तीच्या भावभावना उत्तम मांडल्या आहेत. आणि ती शेवटची कविता!!! माझी मैत्रीण अश्विनी त्यावेळी मदतीला धावून आली. या सिनेमाचा शेवट वेगळा होता.
पण मंगळागौर गाणं संपल्यावर एवढ्या उंचीवर गेल्यानंतर पुन्हा कुठला सीन करणं जड जाणार होतं. ही कवितेची आयडिया डोक्यात आली. संपुर्ण सिनेमाचा सार व्यक्त करणारी ती कविता अश्विनीने लिहिली. या प्रवासात असंख्य माणसं महत्वाची ठरली. कोटीची उड्डाणं करणारा हा सिनेमा तयार होताना ही मंडळी विसरून चालणार नाहीत, असे केदार शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने दहा दिवसांमध्ये एकूण २६.१९ कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या मुख्य भूमिकेत आहेत.