Kedar Shinde & Suraj Chavan : केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सिनेमात सूरज चव्हाण पहिल्यांदाच मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणार आहे. सूरजचं शिक्षण पूर्ण न झाल्याने त्याला लिहिता-वाचता येत नाही. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला स्क्रिप्ट, अभिनय या गोष्टी कशा समजावून सांगितल्या याबद्दल दिग्दर्शकांनी ‘लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
सूरजकडून नैसर्गिकरित्या अभिनय करून घ्यायचा हे केदार शिंदेंनी आधीच ठरवलं होतं. त्यामुळे शूट करताना त्यांनी अशा काही गोष्टी केल्या जेणेकरून सूरज आपोआप त्याच्या भूमिकेचं गांभीर्य समजून घेईल. यादरम्यानचा एक भन्नाट किस्सा केदार शिंदेंनी यावेळी सांगितला.
केदार शिंदे म्हणाले, “सूरजला लिहिता-वाचता येत नाही. त्यामुळे निश्चितच त्याला एखादी गोष्ट समजावताना विशेष मेहनत घ्यावी लागते. आम्हाला सलग दोन रात्री एका इमोशनल सीनचं शूटिंग करायचं होतं. त्यामुळे मी दिवसभर तशी वातावरण निर्मिती करून ठेवायचो. मी त्याला प्रचंड हर्ट केलं आहे. तुम्ही विचारही करू शकत नाही इतकं मी त्याला हर्ट केलंय. मी शिव्या वगैरे देत नाही. पण, आरडाओरडा करून मी ते वातावरण इतकं गंभीर करून ठेवलं होतं की, संध्याकाळी तो इमोशनल सीन आल्यावर तो बरोबर काम करायचा. कारण, दिवसभर तो एवढा दुखावलेला असायचा की, मी जसं सांगेन तसं त्याने लगेच गोष्टी केल्या. पण, त्या दोन दिवसांमध्ये मी त्याच्यावर खूप लक्ष ठेवून होतो. त्यालाही ही गोष्ट माहिती नव्हती. आता परवाच मी त्याला याबद्दल सांगितलं.”
“मी प्रोडक्शन टीमला आधीच सांगितलं होतं की, ते दोन दिवस याची जी रुम आहे त्याला बाहेरून कडी लावून टाका. जेणेकरून हा चिडला वगैरे असेल तर कुठेही निघून जाणार नाही. कारण, तो मध्यरात्री कुठे निघून गेला तर काय करायचं… असा विचार करून मी तसं आधीच प्रोडक्शनला सांगितलं होतं. त्यालाही ही गोष्ट माहिती नव्हती. परवाच्या दिवशी मी त्याला ही गोष्ट सांगितली.” असं केदार शिंदेंनी स्पष्ट केलं.
सूरज यावर म्हणाला, “मला आधी याबद्दल काहीच माहिती नव्हतं की, हे लोक कडी लावून वगैरे जायचे. कारण, मी रात्री एकदा झोपलो की, थेट सकाळी दार वाजवून कडी उघडायला सांगायचो. मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. पण, खरं सांगू का? मी कुठेच बाहेर गेलो नसतो. कारण, माझ्यासाठी करिअर आणि हा चित्रपट महत्त्वाचा होता. मी कितीही हर्ट झालो, दुखावलो तरीही हा सिनेमा मला करायचा होता. कारण, माझ्यात हा विश्वास सरांनी निर्माण करून दिला आहे. जेव्हा आपण मेहनत करतो, कष्ट करतो तेव्हाच पुढे जाऊन चांगल्या गोष्टी घडतात.”
दरम्यान, केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमात सूरज चव्हाणसह जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी असे अनेक लोकप्रिय कलाकार झळकले आहेत.