कोणताही चित्रपट हा कथा, अभिनय आणि दिग्दर्शनावर अवलंबून असतो. या तिन्ही गोष्टींची सांगड उत्तमरित्या झाली की चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरतो. असाच मराठीतला, सध्या सगळीकडे बोलबाला सुरू असणारा चित्रपट म्हणजे ‘बाईपण भारी देवा’. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरू आहे. ‘सैराट’, ‘वेड’, ‘धर्मवीर’, ‘चंद्रमुखी’ यांसारख्या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटानंतर ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटानं पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात दुप्पट कमाई केल्याचं समोर आलं आहे.
केदार शिंदे यांनी नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिसऱ्या आठवड्याची दणक्यात सुरुवात असं लिहिलेला एक फोटो त्या पोस्टमध्ये आहे. ज्यामध्ये ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटानं पहिल्या आठवड्यात १२.५० कोटी, तर दुसऱ्या आठवड्यात २४.८५ कोटींचा गल्ला जमवल्याची माहिती आहे. आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर एकूण या चित्रपटानं ३७.३५ कोटी रुपये कमावले आहेत.
हेही वाचा – आशुतोष गोवारीकर ओटीटीवर करणार पदार्पण, ‘या’ वेब सीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस
केदार शिंदेंनी ही पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, “दर आठवड्याला हा सुखद धक्का मिळत राहो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री सिद्धिविनायक महाराज की जय. प्रेक्षकांना साष्टांग दंडवत.”
हेही वाचा – Video: ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वात मराठमोळ्या व्हिडीओ क्रिएटरची दमदार एंट्री
दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटानं प्रदर्शनानंतरच्या दुसऱ्या रविवारी, ९ जुलैला विक्रमी कमाई केली होती. एकाच दिवसात तब्बल ६.१० कोटींचा गल्ला जमवला होता. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आजवरचे एका दिवसातील हे सर्वाधिक कलेक्शन असल्याचं केदार शिंदेंनी सांगितलं आहे. आता येत्या रविवारी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय जादू करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.