केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सूरज चव्हाण प्रमुख दिसणार असून, जुई भागवतदेखील त्यांच्याबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
त्याला का हीरो म्हणून घेतलाय?
नुकतीच केदार शिंदे व सूरज चव्हाणने ‘प्लॅनेट मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत केदार शिंदे यांनी ट्रोलिंगबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, “आमच्या वेळी सोशल मीडिया असता, तर आज सूरज रोज सहन करतोय. म्हणजे हा कोण आहे? त्याला का हीरो म्हणून घेतलाय? काय दिसतो? या सगळ्या गोष्टी आमच्या बाबतीतही तेव्हा झाल्या असत्या. शेवटी कोणी काही बोललं तरी आम्ही त्यांची तोंडंं बंद करू शकत नाही. आम्ही फक्त आमचं काम त्यांना दाखवू शकतो. २५ एप्रिल काही फार दूर नाही. त्यामुळे हा सूर्य हा जयद्रथ”, असे म्हणत जे ट्रोल करतात, त्यांना फक्त काम दाखवू शकतो, असे केदार शिंदे यांनी म्हटले.
‘झापुक झुपूक’ या चित्रपटात सगळे तरुण कलाकार आहेत. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत केदार शिंदे म्हणाले, “आपण नवनवीन प्रयोग करण्याची गरज आहे. लोकांना जर नावीन्य मिळालं पाहिजे. ते कथेच्या माध्यमातून पहिल्यांदा यायला पाहिजे. त्या बरोबरीने प्रेझेंटेशनच्या माध्यमातून यायला पाहिजे. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या वेळी मी इतक्या यशस्वी अभिनेत्रींबरोबर काम केलं. पण, तेव्हा त्या चित्रपटासाठी निर्माता मिळताना मला नाकीनऊ आले होते. निर्मात्यांचं मत होतं की, बायकांना बघण्यासाठी काय गर्दी होणार आहे? पण माझ्याकडे कथा अप्रतिम होती. तेव्हा मी सगळ्या दिग्गज लोकांबरोबर काम केलं. त्यामुळे आपण आपलं काम करूया. आपण किती प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टी करतोय, याच्याकडे लक्ष देऊया.”
यश-अपयश या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. आपण आडाखे बांधत राहिलो ना की, मी अमुक या गोष्टी केल्या तर अमुक या गोष्टी होतील, मग गडबड होते. सिनेमा माझ्यासाठी मुलाला जन्म देण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे नऊ महिन्यांनंतर आपण बाळाला जन्म देतो. त्यानंतर ते बाळ सुदृढ आहे की नाही आणि त्याचं संगोपन होऊन त्याच्यावर पुढे संस्कार व्यवस्थित होत आहेत की नाही, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
आनंद एकाच गोष्टीचा आहे की, मी आणि निखिल साने आम्ही दोघे तेवढे सक्षम आहोत. कारण- झापुक झुपूक आमच्यासाठी बाळ आहे. त्याची क्रिएटिव्ह बाजू मी जरी सांभाळत असलो तरीही लोकांसमोर हा चित्रपट कसा जावा आणि काय करावं यासाठी जिओ स्टुडिओ आणि निखिल साने ते काम करीत आहेत. ज्या पद्धतीने बाईपण भारी देवा या चित्रपटाच्या वेळी जे मॅजिक निर्माण केलं होत, ते मॅजिक लोकांना आताही पाहायला मिळेल, असं वाटतं. याबरोबरच सूरज चव्हाण म्हणाला की, ट्रेलर लॉंचच्या वेळी रितेश देशमुखसर आले होते. त्यामुळे मी खूप खूश होतो.
दरम्यान, झापुक झुपूक या चित्रपटात सूरज चव्हाण, जुई भागवत यांच्याबरोबरच इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी असे अनेक लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सूरजची निरागस व रौद्र अशी दोन्ही रूपे ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली होती. आता हा चित्रपट उद्या शुक्रवारी २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.