बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व खूप गाजले. ७० दिवसांच्या प्रवासानंतर या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला. बारामतीजवळच्या मोढवे गावात एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या सूरज चव्हाणने सर्व स्पर्धकांना मागे टाकत या रिअॅलिटी शोचं विजेतेपद पटकावलं. ६ ऑक्टोबर रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडला होता. या फिनालेमध्ये कलर्स वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड व मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला शब्द दिला होता, तो शब्द त्यांनी पाळला आहे.
केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठी ५ च्या ग्रँड फिनालेमध्ये सूरज चव्हाणबरोबर चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती. ‘झापुक झुपूक’ असं या चित्रपटाचं नाव असेल, असं त्यांनी सांगितलं होतं. आता ग्रँड फिनालेनंतर अडीच महिन्यांनी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला आहे. मुहूर्त सोहळ्याचा फोटो शेअर करून खास कॅप्शन दिलं आहे.
हेही वाचा – Video: लोकलने प्रवास करणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? सीरिज नेटफ्लिक्सवर आहे ट्रेंडिंग
“७ ऑक्टोबरला बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले झाला. मी आणि जिओ स्टुडिओज यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे. सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला घेऊन हा सिनेमा करतोय. बाईपण भारी देवा नंतरचा माझा सिनेमा. अपेक्षा तुमच्या जेवढ्या आहेत तेवढ्याच माझ्या माझ्याकडून आहेत. पण नवा डाव मांडतोय. आशीर्वाद आणि शुभेच्छा असू द्यात”, असं कॅप्शन केदार शिंदेंनी दिलं.
पाहा पोस्ट –
‘झापुक झुपूक’ चित्रपटात जुई भागवत, दीपाली पानसरे, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, बेला केदार शिंदे करणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे करणार आहेत.