Kedar Shinde : दिग्दर्शक केदार शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत. सध्या ते ‘झापुक झुपूक’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. केदार शिंदेंनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात ‘बिग बॉस मराठी’चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिका साकारत आहेत. नुकतीच दिग्दर्शकांनी ‘जस्ट नील थिंग्स’च्या पॉडकास्टला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी ‘जत्रा’ सिनेमाबद्दल भाष्य केलं.

‘जत्रा’ सिनेमा केल्यावर केदार शिंदे कर्जात बुडाले होते. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं आणि या सगळ्या अनुभवातून शिकून पुढे जाऊन त्यांनी सनाला काय सल्ला दिला याबद्दल जाणून घेऊयात…

केदार शिंदे म्हणाले, “२००५ मध्ये मी ‘जत्रा’ सिनेमा केला. त्यावेळी माझं वय ३२ होतं आणि माझ्यावर तो सिनेमा केल्यावर १ कोटी २० लाखांचं कर्ज होतं. कारण, क्रेडिट आणि डेबिट याचं गणित मला समजलंच नाही. आपण किती खर्च केला पाहिजे आणि आपल्याला परत काय मिळणार याचा विचारच केला नव्हता. कारण, आपल्यासारखे क्रिएटिव्ह लोक भावनिकदृष्ट्या प्रत्येक गोष्टीचा विचार करतात आणि आपल्याला व्यवहार कळत नाही. आपण वाहवत जातो…पुढची १० वर्षे मी ते कर्ज फेडत होतो.”

“आपण आयुष्यात एकदा तरी खड्ड्यात पडतो. पण, खड्ड्यात पडल्यावर आपण किती वेगाने परत उठतोय हे फार महत्त्वाचं आहे. यशाचा कोणताच फॉर्म्युला नाहीये. ‘बाईपण भारी देवा’ सुपरहिट झालाय मग, येणारा प्रत्येक सिनेमा तुफान चालेल असं काहीच नसतं. मी माझे पूर्ण प्रयत्न करणार…कधीच डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही. मी माझ्या मुलीला नेहमी सांगतो की, काहीही कर पण पाय जमिनीत ठेव, जमिनीवर नाही. यामुळे आपण शांतपणे राहू.” असं केदार शिंदे यांनी सांगितलं.

दरम्यान, यापूर्वीच्या मुलाखतीत ‘जत्रा’ सिनेमाबद्दल केदार शिंदे म्हणाले होते, “जत्रा’ या चित्रपटादरम्यान माझं सर्व काही पणाला लावलं होतं. मी माझ्या बायकोचे दागिने विकले होते. प्रेक्षकांसाठी ‘जत्रा’ सुपरहिट ठरला. पण त्यावेळी माझ्या डोक्यावर मोठं कर्ज होतं.”