गेले अनेक महिने ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती. अखेर हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे, तर अभिनेता अंकुश चौधरी याने या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. सना शिंदे व अश्विनी महांगडे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकांत दिसत आहेत. चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांकडून मिळणारं हे प्रेम पाहून केदार शिंदे आणि चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांना खास भेट दिली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद, गाणी, सर्व कलाकारांचा अभिनय हे सर्वच प्रेक्षकांना खूप आवडलं आहे. सोशल मीडियावर हा चित्रपट आवडल्याचं सांगत या चित्रपटाच्या टीमचं नेटकरी भरभरून कौतुक करत आहेत. तर चित्रपटात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं सुरू झाल्यावर अनेक शोजदरम्यान प्रेक्षक उठून उभे राहत असल्याचेही अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. प्रेक्षकांकडून मिळणारा हा प्रतिसाद पाहून या चित्रपटाच्या प्रेक्षकांना केदार शिंदेंनी मोठं सरप्राईज दिलं आहे.
या चित्रपटातील सर्व गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आघाडीचे संगीतकार-गायक अजय-अतुल यांनी या चित्रपटाच्या सांगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आता शाहीर साबळे यांचं या चित्रपटातून प्रदर्शित न झालेलं गाणं प्रदर्शित केलं गेलं आहे. ‘मी तर होईन चांदणी’ असं या गाण्याचं शीर्षक आहे. या गीताला अजय-अतुल यांनी सांगीतबद्ध केलं आहे. तर अंकुश चौधरी आणि सना शिंदे यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे.
‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट’च्या यूट्यूब चॅनेलवरून हे गाणं प्रदर्शित केलं गेलं आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी त्यांना हे गाणं आवडल्याचं सांगत आहेत.