Baipan Bhari Deva Film : केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने दमदार कमाई केली असून, अवघ्या १० दिवसांमध्ये २६ कोटींचा गल्ला जमावला आहे. ‘बाईपण भारी देवा’ जरी २०२३ मध्ये प्रदर्शित झाला असला, तरीही प्रत्यक्ष चित्रपटाच्या शूटिंगला २०१९ मध्ये सुरुवात झाली होती. २०१९ मध्ये चित्रपटासाठी निर्माते शोधताना कशी अडचण आली याबाबत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकताच एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘हर हर महादेव’चा जयघोष! अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘OMG 2’ चा दमदार टीझर प्रदर्शित

‘बाईपण भारी देवा’च्या यशानंतर दिग्दर्शक केदार शिंदेंसह चित्रपटातील मुख्य अभिनेत्रींनी ‘लेट्सअप मराठी’ला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी केदार शिंदेंनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या अनेक गोष्टींबाबत खुलासा केला. ते म्हणाले, “२०१९ मध्ये ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटासाठी मी पूर्ण वर्षभर निर्माता शोधत होतो. आता या गोष्टीवर कदाचित कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण हेच खरं आहे. मी ज्या लोकांसमोर या चित्रपटाची गोष्ट वाचून दाखवली त्यांना एकंदर सिनेमाची गोष्ट आवडायची पण, ते लोक बोलायचे यात ‘जत्रा’सारखी काहीतरी आगळीवेगळी कथा हवी. या गोष्टीत ‘जत्रा’सारखे काही नाही.”

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’चा असाही परिणाम! दिग्दर्शक केदार शिंदे गौप्यस्फोट करीत म्हणाले, “आता स्त्रिया मला…”

केदार शिंदे पुढे म्हणाले, “लोक मला म्हणायचे या ६ बायकांबरोबर चित्रपट करून काय करणार? आता मी त्यांना तेव्हा कसे पटवून देऊ की, या ६ बायकाच जादू करतील आणि जादू म्हणजे चित्रपट करोडो रुपये कमावणार असा होत नाही. माझे कास्टिंग पहिल्या दिवसापासून हेच होते, याची या सगळ्यांना कल्पना आहे. सगळ्या अभिनेत्रींकडे शूटिंग सुरु होण्यापूर्वी जवळपास ४ महिने आधी स्क्रिप्ट पाठवल्या होत्या. माझ्या कास्टिंगमध्ये अजिबात बदल झाला नाही.”

हेही वाचा : “माझा संघर्ष संपलेला नाही” अभिनेत्री प्रिया बापटने मांडले स्पष्ट मत; म्हणाली, “भविष्यात चित्रपटसृष्टीत…”

“सगळ्या गोष्टी असूनही निर्माता मिळत नव्हता, याचे मला प्रचंड वाईट वाटले. बऱ्याचदा निर्माता मिळत नाही याचा विचार करून माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण, बऱ्याच वर्षांनी मी या चित्रपटाची योजना आखली होती.” हा अनुभव केदार शिंदेंनी चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षकांना सांगितला. दरम्यान, चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब, सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kedar shinde reveals baipan bhari deva movie did not get any producer in 2019 sva 00