प्रख्यात शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच शाहीर साबळे यांची आज जयंती. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या शाहीर साबळेंचं भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत फार मोठे योगदान आहे. त्यांचं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत आता महाराष्ट्राचं राज्यगीत झालं आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने नातू केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. तसंच या पोस्टच्या माध्यमातून एक खंत देखील व्यक्त केली आहे.

केदार शिंदे यांनी शाहीर साबळेंचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग. शाहीर साबळे म्हणजे माझे बाबा. दरवर्षी या दिवशी नाही तर, सतत त्यांना मी मीस करतो. कारण आज जो काही मी आहे तो, एक स्वामींमुळे आणि माझ्या बाबांमुळे. माझ्या आयुष्यात त्यांचे कलात्मक संस्कार झाले नसते तर मी काय केलं असतं?”

हेही वाचा – Video: ‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाण मालिकेच्या सेटवर दिसला चिंच खाताना, पाहा व्हिडीओ

पुढे केदार यांनी लिहिलं, “३ सप्टेंबर म्हणजे आमच्या बाबांच्या घरी सण साजरा व्हायचा. घराबाहेर चपलांचा सडा पडलेला असायचा. कोण, कुठले येऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचे. चहापाणी यांची रेलचेल असायची. महाराष्ट्रातील रसिकांसाठी त्यांनी खूप काही केलं त्याही पेक्षा महाराष्ट्रातील जनतेसाठी एक शाहीर म्हणून कर्तव्य बजावलं आहे. बहुजन समाजातून आल्याने त्यांना so called recognisation नाहीच मिळालं, पण त्यांनी लोकांची मन जिंकली आणि आवाजाने कान तृप्त केले. मी त्यांच्यासाठी येणाऱ्या पिढ्यांना स्मरण असावं म्हणून ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा केला. आता कित्येक पिढ्या Google search मारतील, shaheer? आणि यांचा जीवनपट समोर येतच राहील. श्री स्वामी समर्थ.”

हेही वाचा – ‘झुंड’ फेम अंकुश गेडाम दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा झळकणार मोठ्या पडद्यावर, बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटात लागली वर्णी

दरम्यान, २० मार्च २०१५ रोजी मुंबईतल्या राहत्या घरी वृद्धापकाळाने शाहीर साबळे यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९४ वर्षांचे होते. त्यांना जाऊन आता ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. शाहीर साबळे हे केदार शिंदे यांचे आजोबा आहेत. केदार शिंदेंच्या आईचे ते वडील होते. गेल्या वर्षी केदार यांनी शाहीर साबळेंच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट केला होता. या चित्रपटात शाहिरांची भूमिका अभिनेता अंकुश चौधरीने साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता.