Kedar Shinde : सूरज चव्हाण हा सध्या त्याच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी ५’ च्या महाअंतिम सोहळ्यात दिग्दर्शक केदार शिंदेंनी सूरजबरोबर चित्रपट करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता येत्या २५ एप्रिल रोजी सूरज मोठ्या पडद्यावर त्याचा ‘झापुक झुपूक’ हा चित्रपट घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का ‘बिग बॉस’च्या पहिल्याच दिवशी सूरजचं या चित्रपटासाठीचं कास्टिंग झालं होतं. याबद्दल स्वत: केदार शिंदेंनी सांगितलं आहे.
केदार शिंदेंनी सांगितला सूरज चव्हाणच्या कास्टिंगचा किस्सा
‘केदार शिंदे आणि सूरज चव्हाण यांनी नुकतीच लोकशाहीशी संवाद साधला. यावेळी केदार शिंदेंनी सूरजच्या कास्टिंगचा किस्सा सांगितला आहे. याबद्दल ते असं म्हणाले की, “पहिल्याच दिवशी सोळा स्पर्धकांना ‘बिग बॉस’च्या घरात पाठवलं. तेव्हा रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावर होते आणि तो प्रीमियर पार पडला. त्याच रात्री चॅनेल रूममध्ये मी बसलो होतो आणि समोर टेलीव्हिजन होतं, ज्यावर सगळ्या कॅमेऱ्यातले दृश्य दिसत होते. तेव्हा एका कॅमेऱ्यात सुरज मला वॉशरूममध्ये जाताना दिसला.”
केदार शिंदेंनी सांगितलं, “सूरजला घरातील लोकांची कल्पना नव्हती”
यापुढे त्यांनी सांगितलं की, “आम्ही घरात एक गंमत केली होती. साधारपणे दरवाज्या डाव्या बाजूने उघडतात; पण आम्ही त्या घरातील वॉशरूमचे दरवाजे उलट दिशेने उघडण्यासाठी केलं होतं. तेव्हा हा गावातून आलेला मुलगा. त्याला इथलं काही माहिती नव्हतं. इतकं मोठं घर आणि त्या घरातल्या लोकांची त्याला कल्पना नाही. एक-दोन लोकांनाच तो फक्त ओळखत होता. तो वॉशरूममध्ये शिरला आणि जिथून दरवाजा आम्ही बंद केला होता तिथेच तो ढकलत होता.”
केदार शिंदेंनी सांगितलं, “त्यासाठी मला सूरजच हवा होता”
यानंतर केदार शिंदेंनी असं सांगितलं की, “सूरज जवळजवळ हे असं सात मिनिटे करत होता आणि तो “हे कसं केलंय? उघडत पण नाय” असं स्वत:शीच बोलत होता. तो तिथून निघाला आणि वर्षा उसगांवकर त्याला दिसल्या. तर त्यांनी पण त्याला प्रेमाने विचारलं. त्यावर सूरजने पण सांगितलं की, “हा दरवाजा उघडत नाहीय.” मग त्यांनी अगदी सहज तो दरवाजा उघडला. त्यावर याचं वाक्य होतं, “अच्छा इकडून बंद केलंय होय”. तर हा साधेपणा आणि कोणतीही गोष्ट माहिती नसल्याची एक भावना या पात्रासाठी मला हवी होती आणि त्यासाठी मला सूरजच हवा होता.”
केदार शिंदेंनी सांगितलं, “मी सूरजबरोबर जबाबदारीने काम केलं आहे”
यानंतर केदार शिंदे असं म्हणाले की, “आजपर्यंत माझं कास्टिंग ९९.९९ टक्के चुकेलेलं नाही. कारण सिनेमा, मालिका किंवा नाटकात व्यक्ती समोर आली की, ५० टक्के काम असतं की, तो पात्रासाठी योग्य असणं. प्रेक्षक म्हणून तो योग्य वाटत असेल तर उरलेले ५० टक्के दिग्दर्शकाची असतात. त्याने ते काम करून घेणं. मी हे काम करणारच होतो. ‘बाईपण भारी देवा’नंतरचा हा सिनेमा आहे. मी कुठलीच गोष्ट हलक्यात घेणारा माणूस नाही. मला माहिती होतं मी जबाबदारी घेणार आणि जबाबदारीनेच ते काम पूर्ण करणार. जे सूरजबरोबर आता केलं आहे.”