शाहीर कृष्णराव साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष ३ सप्टेबर २०२२ पासून सुरू झाले आहे. यानिमित्ताने, शाहीरांचा जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर’ या नावाने पडद्यावर आणण्याचा ध्यास त्यांचे नातू दिग्दर्शक केदार शिंदे यांनी घेतला आहे. गेले अनेक महिने ते या चित्रपटावर काम करत आहेत. सध्या सर्वजण या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त अस्तानाच या केदार शिंदे यांनी शाहीर साबळे यांच्या परेल येथील घराची झलक दाखवली आहे. तसंच या घराला कोणत्या दिग्गज मंडळींचे पाय लागले हेही चाहत्यांशी शेअर केलं आहे.
केदार शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शाहीर साबळे यांचे घर आणि चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ एकत्रित करून शेअर केला. या व्हिडीओच्या सुरुवातीला शाहीर साबळे यांचे परेल येथील घर दिसत आहे. त्यांचं H-27 नंबरचं घर, त्यांच्या घराची पत्रपेटी, दरवाजा आणि त्यावर असलेली ‘शाहीर साबळे’ नावाची पाटी, दरवाजावर तोरण, हे सगळं या व्हिडीओत दिसत आहे. त्यांच्या घराच्या या व्हिडीओमध्ये “शहीर साबळे यांच्या परेल येथील घराचं घरपणच वेगळं होतं,” असं लिहिलेलं दिसत आहे. तर त्यानंतर या व्हिडीओत “ह्या घराला अनेक महारथींचे पाय लागले,” असं लिहून सेटवरील काही दृश्य दिसत आहेत. शाहीर साबळे, भानुमती, राजा मयेकर, लता मंगेशकर, बाळासाहेब ठाकरे, देवदत्त, चारुशीला, यशोधरा, वसुंधरा यांची नाव व्हॅनिटी व्हॅनवर लावलेली दिसत आहेत.
हेही वाचा : “पायाजवळ घोणस आली आणि…”; उमा पेंढारकरने सांगितला शूटिंगदरम्यानचा चित्तथरारक अनुभव
हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहीलं, “परेल येथे बाबांच्या (शाहीरांच्या) ज्या घरात आमचं बालपण गेलं.. जिथे अनेक रथी महारथी भेट देऊन गेले.. आज जिथे बाबांच नाव निशाणी सुद्धा उरलेली नाही.. त्याच H-27 ला आणि तिथे घडलेल्या अनेक प्रसंगाना पडद्यावर साकारताना खूप इमोशनल व्हायला होतंय.. आशा आहे की आमचा हा प्रवास तुम्हालाही भावेल…”
आणखी वाचा : “बहुतेक हे विधीलिखित होतं…”; केदार शिंदे यांनी अजय-अतुल यांच्यासाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची भूमिका साकारणार आहे. त्यासोबतच अभिनेत्री अश्विनी महांगडे हीदेखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजे २८ एप्रिल २०२३ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.