‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपून दोन महिने पूर्ण झाले आहेत. या पर्वाचा विजेता बारामतीचा सूरज चव्हाण ठरला. ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा झाला. या सोहळ्यात सूरज चव्हाणसाठी लोकप्रिय दिग्दर्शित आणि कलर्सचे प्रोगोमिंग हेड केदार शिंदेंनी मोठी घोषणा केली. सूरजला घेऊन एक चित्रपट करणार असून या चित्रपटाचं नाव ‘झापुक झुपूक’ असणार, असं केदार शिंदे यांनी जाहीर केलं होतं. आता प्रत्यक्षरित्या या चित्रपटाच्या कामाला सुरुवात झाली आहे. नुकताच ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. याचे फोटो समोर आले आहेत.
अभिनेत्री दीपाली पानसरेने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘झापुक झुपूक’ चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत दीपाली पानसरेने लिहिलं की, जे ठरवलं होतं ते सत्यात उतरलं. मी गेल्या कित्येक दिवसांपासून केदार शिंदेंबरोबर काम करण्याची वाट पाहत होते. अखेर तो क्षण आलाच. केदार शिंदे आणि बेला शिंदे तुमचे खूप खूप धन्यवाद. ‘झापुक झुपूक’ टीमला शुभेच्छा.
हेही वाचा – मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेने लग्नाचा पहिला वाढदिवस ‘असा’ केला साजरा, पाहा फोटो
दीपालीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरे पाहायला मिळत आहेत. केंदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चिपटात सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील हे लोकप्रिय कलाकार दिसणार आहेत. यामध्ये ‘पिरतीचा वनवा उरली पेटला’ मालिकेतील इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, ‘अबीर गुलाल’ मालिकेतील पायल जाधव, ‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे झळकणार आहेत.
हेही वाचा – Bigg Boss 18: “कानाखाली देईन, तू हृतिक रोशन नाहीये”, कशिश कपूर अविनाश मिश्रावर भडकली, नेमकं काय घडलं? वाचा…
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे, बेला शिंदे निर्मित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण, या चित्रपटाची आतापासूनच प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दीपालीच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. “अभिनंदन…चित्रपट कधी येणार”, “जबरदस्त”, “या नव्या चित्रपटासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.