मराठी सिनेसृष्टीत ‘अगं बाई अरेच्छा’, ‘जत्रा’, ‘बाईपण भारी देवा’सारख्या दर्जेदार कलाकृतींची निर्मिती करणारे लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून केदार शिंदेंना ओळखलं जातं. सध्या ते ‘झापुक झुपूक’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने ‘बिग बॉस’ विजेता सूरज चव्हाण पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सूरज आणि केदार शिंदे यांची भेट ‘बिग बॉस’ शोमुळे झाली. ‘बिग बॉस मराठी’ हा शो ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर प्रसारित होत होता आणि केदार शिंदे वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड होते. या पाचव्या सीझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. याशिवाय शोला आतापर्यंतच्या चार सीझनपेक्षा टीआरपी सुद्धा मोठ्या प्रमाणात होता. याबद्दल केदार शिंदेंनी ‘जस्ट नील थिंग्स’च्या पॉडकास्टवर भाष्य केलं आहे. इतकंच नव्हे तर, त्यांना ‘बिग बॉस मराठी’चा पहिला सीझन ऑफर करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

केदार शिंदे म्हणाले, “मी स्वत: ‘बिग बॉस’ पाहायचो. पण, मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की, मी ‘बिग बॉस’चा हा सगळा सेटअप करेन. कधीच नाही…; ‘कलर्स मराठी’ने जेव्हा या शोचा पहिला सीझन ( २०१८ ) प्रेक्षकांसमोर आणला होता. तेव्हा स्पर्धक म्हणून मला विचारणा झाली होती. मला फोन आला होता आणि मी त्यांना खूप पैसे सांगितले होते. ते समोरुन मला म्हणाले, ‘एवढे पैसे सांगताय, कसं काय?’ मग मी म्हटलं, ‘मी माझं अख्खं आयुष्य सांगणार, वाट लावणार मग, पैसे तरी मिळूदेत.’ मग त्यांनी काही मला घेतलं नाही… त्यानंतर पाचव्या सीझनमध्ये मी शोचा प्रमुख म्हणूनच काम पाहिलं.”

“बिग बॉस’ अजिबातच स्क्रिप्टेड नाहीये. मी खूप जबाबदारीने हे वाक्य बोलतोय…मी स्वत: तिथे होतो. अजिबात स्क्रिप्टेड नाहीये कारण, ते स्पर्धक आत गेल्यावर आमचाही त्यांच्याशी संबंध नव्हता. आम्ही कोणीही आतमध्ये जाऊ शकत नव्हतो. पण, प्रत्येक एपिसोड एडिट होताना मी स्वत: बसलेलो आहे. प्रत्येक एपिसोड हा एखाद्या फिल्मसारखा कसा सादर करायचा या सगळ्याचा विचार केला होता. टीमही अप्रतिम होती.” असं केदार शिंदेंनी सांगितलं.

दरम्यान, केदार शिंदेंच्या ‘झापुक झुपूक’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये सूरजसह जुई भागवत, इंद्रनील कामत, मिलिंद गवळी, हेमंत फरांदे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.