Kedar Shinde : “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे ब्रीद असण्याऱ्या स्वामी समर्थांची प्रचिती देणारी अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली किंवा वाचली असतील. स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि ते आपल्याला कोणत्याही संकटातून वाचवतात अशी श्रद्धा त्यांच्या भाविकांची असते. याबद्दल अनेक भाविकांनी त्यांचे अनुभव सांगितलेही आहेत. मराठी मनोरंजन सृष्टीतीलही अनेक कलाकार हे स्वामी भक्त आहेत आणि या कलाकारांनी वेळोवेळी स्वामीं समर्थांबद्दल त्यांच्या काही खास भावना व्यक्त केल्या आहेत. यापैकीच एक कलाकार म्हणजे केदार शिंदे.
केदार शिंदेंनी श्री स्वामी समर्थांबद्दल व्यक्त केल्या भावना
‘जत्रा’, ‘अगं बाई अरेच्चा’, यंदा कर्तव्य आहे’, ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झापुक झुपूक’चे दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे. आजवर त्यांनी आपल्या चित्रपटांमधून आणि नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. केदार शिंदे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर ते त्यांच्या कामानिमित्तची माहिती शेअर करत असतात. शिवाय ते स्वामी समर्थांबद्दलच्याही अनेक पोस्ट शेअर करत असतात. अशातच त्यांनी स्वामी समर्थांबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे.
“श्री स्वामी समर्थांबरोबर माझा तसा काही संबंधच नव्हता”
केदार शिंदे त्यांच्या ‘झापुक झुपूक’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. याबद्दल ते अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. अशातच त्यांनी कंटेट क्रिएटर नील सालेकरबरोबर संवाद साधला. या संवादात त्यांनी स्वामी समर्थांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी स्वामी समर्थ नसते तर मी मेलोच असतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी ते असं म्हणाले की, “स्वामी समर्थांबरोबर माझा तसा काही संबंधच नव्हता. आमच्या घराण्यात कुणी स्वामी समर्थांचं केलेलं नव्हतं. मी ३ जुलै १९९७ ला पहिल्यांदा त्यांचा फोटो पहिला. ज्यावर लिहिलेलं होतं श्री स्वामी समर्थ… तेव्हा मला समजलं अच्छा, हे आहेत का स्वामी समर्थ.”
“अपघाताने स्वामी समर्थांपर्यंत पोहोचलो आणि आपलंसं केलं”
यापुढे केदार शिंदे असं म्हणाले की, “मी अपघाताने त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांनी मला आपलंसं केलं. मी जे मागत आहे, ते सगळं मला ते देतात असं नाही; ते खूप परीक्षा बघतात. आपण पूर्णपणे रसातळाला पोहोचताना ते मदतीसाठी हात देतात. पण त्यांनी हात दिल्यानंतर ती जी शक्ती असते ती आपल्यालाच लावावी लागते. आपल्याला ते सहज असं काही देणार नाहीत. मी ज्या पद्धतीचं काम केलं आहे, त्या कामात मला खूप त्रास झाला आहे. खूप हरलो होतो. मी संपलो होतो.”
“मी जगत आहे ते स्वामी समर्थांमुळेच नाहीतर मी मेलो असतो”
यानंतर केदार शिंदे म्हणाले की, “या सगळ्यातून मी पुन्हा उठलो आहे. तर हे जे उठणं आहे, त्यात मला त्यांनी साथ दिली आहे. आपला गुण असा आहे की, आपण कठीण काळात परमेश्वराचं नाव घेतो, की देवा लक्ष ठेवा. पण चांगली वेळ असते तेव्हा आपलं आपसूक दुर्लक्ष होतं. माझ्यासाठी स्वामींबद्दल एकच वाक्य आहे, की मी जे जगत आहे, ते त्यांच्यामुळेच… नाहीतर मी मेलोच असतो.” दरम्यान, केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ नुकताच २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
केदार शिंदेंच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाबद्दल थोडक्यात…
‘झापुक झुपूक’ या चित्रपटातून ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाणने मोठ्या पडद्याद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. या चित्रपटात त्याचबरोबर अभिनेत्री जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकारही मुख्य भूमिकेत झळकले आहेत.