Kedar Shinde : ‘अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’, यंदा कर्तव्य आहे’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ आणि ‘बाईपण भारी देवा’ सारख्या यशस्वी आणि लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे. आजवर त्यांनी या सर्व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. त्यांच्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. अशातच आता ते ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणला घेऊन आणखी एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत.
केदार शिंदेंचा ‘झापुक झुपूक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
केदार शिंदे सूरज चव्हाणसह ‘झापुक झुपूक’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्यात त्यांनी सूरजबरोबरच्या या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियासह सर्वच माध्यमातून संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काहीजण चित्रपटावर टीका करत आहेत, तर काहीजण या चित्रपटासाठी उत्सुकता व्यक्त करत आहेत.
“आजपासून माझ्यासाठी एक नवा प्रवास सुरू होतोय”
अशातच केदार शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ‘झापुक झुपूक’ चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. केदार शिंदेंनी त्यांच्या फोटोसह पोस्ट शेअर केली आहे आणि असं म्हटलं आहे की, “आजपासून माझ्यासाठी एक नवा प्रवास सुरू होतोय.. ‘बुक माय शो’वर तिकीट विक्री सुरू होत आहे. कालपर्यंत मी जे काही केलं, त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं आहे. यावेळी पुन्हा विश्वास ठेवा. नाराज नाही करणार. वचन देतो. श्री स्वामी समर्थ.”
चाहत्यांसह कलाकारांनीही केदार शिंदेंना दिल्या शुभेच्छा
केदार शिंदेंनी शेअर केलेल्या या पोस्टखाली अनेकांनी त्यांना कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. क्रांती रेडकर आणि प्रार्थना बेहेरे यांनीही या पोस्टखाली कमेंट्स करत “तुला नेहमीच यश मिळो या शुभेच्छा” असं म्हटलं आहे. तर अनेक चाहत्यांनीही या पोस्टखाली “चित्रपट नक्की सुपरहिट होणार”, “तुम्हाला यश मिळणार”, “अशक्य ही शक्य करतील स्वामी”, “श्री स्वामी समर्थ” अशा कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे.
‘झापुक झुपूक’मध्ये सूरज चव्हाणसह झळकणार ‘हे’ कलाकार
दरम्यान, केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ येत्या २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून सूरज चव्हाण मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज आहे. त्याचबरोबर या चित्रपटात त्याच्यासह जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकारही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.