मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार अलीकडच्या काळात अभिनय क्षेत्रासह अनेक सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपलं मत मांडताना दिसत आहेत. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा असो किंवा राज्यातील राजकारण कलाकार अशा अनेक विषयांवर आपलं मत मांडत लक्ष वेधून घेत असतात. मुंबईतील प्रदूषण ही समस्या सध्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासंदर्भात केतकी माटेगावरकर एक पोस्ट शेअर करत यामध्ये मुंबई महानगरपालिकेला टॅग केलं आहे.
हेही वाचा : Video : “बायको म्हणजे गोंधळात टाकणारं…”, प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत; त्याची पत्नी कमेंट करत म्हणाली…
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. गेले काही दिवस मुंबईवर दिसणारी धुरक्याची चादर सातत्याने टिकून आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. अभिनेत्री केतकी माटेगावरकरने यासंदर्भात पोस्ट शेअर करत लक्ष वेधून घेतलं आहे.
केतकी तिच्या पोस्टमध्ये लिहिते, “गांभीर्याने घ्या! गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. आपल्या परिसरात राहणाऱ्या अनेक लोकांना श्वसनाचे विकार, धुळीची एलर्जी, संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. मुंबईत सुरू असेलली बांधकामे, इमारतीची कामं करणाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन खबरदारी घेणं आवश्यक आहे. जलस्त्रोतांजवळ कोणताही कचरा फेकण्याआधी विचार करा. याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती मी एक जागृत नागरीक म्हणून करत आहे.” या पोस्टमध्ये अभिनेत्रीने सगळ्यात शेवटी मुंबई महानगरपालिकेला टॅग केलं आहे.
हेही वाचा : “मी देखील त्यातलीच एक…”, हेमांगी कवीने मागितली जाहीर माफी, कारण…
दरम्यान, मुंबईत सकाळी आणि सायंकाळच्या वेळेला धुरक्याचे प्रमाण जास्त असते. अशावेळी घराबाहेर किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. तसेच वातावरण धोकादायक असल्याने विशेष काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. या व्यतिरिक्त केतकीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘अंकुश’ चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली आहे. यापूर्वी तिने ‘शाळा’, ‘टाईमपास’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.