मराठी कलाविश्वात सध्या ‘खुर्ची’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये राकेश बापट व अक्षय वाघमारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १२ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटात प्रेक्षकांना खुर्चीचं राजकारण म्हणजेच सत्तेसाठी सुरू असलेली लढाई पाहायला मिळणार आहे. परंतु, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी काही अडथळे निर्माण झाले होते.
‘खुर्ची’ सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर असताना यावर प्रतिबंध लावण्यासाठी पुण्यातील दिवाणी न्यायालयात अविनाश खोचरे पाटील यांनी निर्माते संतोष हगवणेंविरोधात दावा दाखल केला होता. अविनाश खोचरे पाटील यांनी केलेल्या दाव्यानुसार, ‘खुर्ची’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं संपूर्ण काम पाटील यांनी पूर्ण केलं होतं. परंतु, करार असताना देखील निर्मात्यांनी त्यांचं नाव कमी करून स्वत:चं आणि शिव माने यांचं दिग्दर्शक म्हणून नाव लावलं. अविनाश पाटील यांच्या दाव्यानुसार निर्माते संतोष हगवणे न्यायालयात हजर झाले होते. निर्मात्यांनी यावेळी न्यायालयात पाटील यांच्याशी कोणताही करार झाला नसून सदर चित्रपट दिग्दर्शनाचं काम पाटील यांनी केलं नसल्याचं सांगितलं.
निर्मात्यांच्या वकिलांनी पुढे अविनाश पाटील यांनी यापूर्वी सप्टेंबर २०२२ मध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे देखील तक्रार दिली होती आणि ती तक्रार चित्रपट महामंडळाने जानेवारी २०२३ रोजी फेटाळली असंही सांगितलं. त्यामुळे अविनाश खोचरे पाटील ऐन चित्रपट प्रदर्शनाच्या काही दिवस आधी आकस धरून खोटा दावा दाखल करत असल्याचा आरोप यावेळी ‘खुर्ची’ चित्रपटाच्या निर्मात्यांकडून करण्यात आला. अखेर निर्मांत्यांच्या बाजूने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत अविनाश खोचरे पाटील यांचा प्रतिबंधात्मक मनाईचा दावा नामंजूर करून दिवाणी न्यायालयातून ‘खुर्ची’ चित्रपट प्रदर्शित करण्यास हिरवा कंदील देण्यात आला.
दरम्यान, सत्तासंघर्षावर आधारित असलेल्या बहुचर्चित ‘खुर्ची’ चित्रपटात राकेश बापट व अक्षय वाघमारेसह आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, अभिनेत्री प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.