अभिनेते किरण माने यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा राजकारणातील प्रवास सुरू केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत त्यांनी हाती शिवबंधन बांधलं. आज त्यांनी एक पोस्ट शेअर करत भाऊराव पाटील व प्रबोधनकार ठाकरे यांचा एक किस्सा सांगितला आहे. किरण मानेंनी पोस्टमध्ये काय म्हटलंय, ते जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्यावेळी रागाच्या भरात कूपरवर गोळी झाडली असती तर??? कल्पनाच करवत नाही. सातारी ‘रग’ लै डेंजर. योग्य मार्गाला लागली तर समाज बदलवण्याची ताकद असते त्यात. भरकटली तर स्वत:सकट अनेकांचे उद्धवस्तही करू शकते.
त्यावेळी भाऊरावांना भानावर आणणारा ‘तो’ महामानव तिथे नसता तर बंदुकीच्या त्या एका गोळीनं महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक जीवनाच्या मुळावरच घाव घातला असता! कदाचित आज महाराष्ट्रातल्या बहुजनांची अवस्था ‘गायपट्ट्या’सारखी भयाण आणि दारूण असती…
पिढ्यानपिढ्या अज्ञानात अडाणीपणात खितपत पडलेल्या बहुजनांच्या पोरांच्या उद्धारासाठी ‘रयत शिक्षण संस्था’ हे भाऊरावांचं स्वप्न होतं… पोरांसाठी बोर्डिंग उभं करायचं होतं. पण पैसा नव्हता. अशात त्यांना धनजीशहा कूपर हे श्रीमंत गृहस्थ भेटले. त्यांना कूपर कंपनी सुरू करायची होती. त्यांच्याकडे पैसा होता आणि भाऊरावांकडे मॅनेजमेंट स्कील! ‘आपका पैसा, मेरा दिमाग’ या तत्त्वावर पार्टनरशीप ठरली. कारखाना उभा राहिला. मागासांसाठीच्या ‘शाहू बोर्डिंग’चं स्वप्न पूर्ण होणार या आशेनं भाऊरावांनी कारखान्याच्या कामात अक्षरश: रात्रंदिवस स्वत:ला झोकून दिलं. पण प्रत्यक्षात जेव्हा उत्पन्नाचा भाग देण्याची वेळ आली तेव्हा कूपर महाशयांनी पलटी मारली! ऐनवेळी हात वर केले. व्यवहार तोंडीच ठरला होता. भाऊराव हतबल झाले.
भाऊरावांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. विश्वासघाताच्या वेदनेनं जिवाची लाही लाही झाली. “सातारी बाणा आहे माझा. सुकासुकी जाणार नाही. त्या कूपरच्या पाठीचे हातभर सालटे काढूनच जाईन.” अशा वाघासारख्या डरकाळ्या फोडत रात्रभर कंपनीभोवती येरझार्‍या घातल्या. सकाळी कूपरला हसत हसत गाडीतून उतरताना बघताच संतापाचा कडेलोट झाला. भाऊरावांनी सरळ बंदूकीत गोळ्या भरल्या आणि ते धनजीशाहना खलास करायला धावले… भाऊरावांच्या पत्नी जिवाच्या आकांतानं ओरडू लागल्या, “कुणीतरी थांबवा त्यांना.”
त्याचवेळी एका देवमाणसानं धावत जाऊन भाऊरावांना पकडून त्यांच्या हातातली बंदुक हिसकावुन घेऊन लांब फेकून दिली आणि त्यांना जळजळीत शब्दांत कानउघडणी करून भानावर आणलं… तो महामानव होता आदरणीय प्रबोधनकार ठाकरे! खूप काळानंतर ‘रयत’ नांवारूपाला आल्यावर प्रबोधनकारांच्या एकसष्ठीला झालेल्या भाषणात भाऊरावांनी आपल्या आयुष्यातलं हे गुपित फोडलं… ते म्हणाले, “प्रबोधनकार ठाकरे हे माझे गुरू तर आहेतच, पण मी त्यांना वडिलांप्रमाणे पूज्यनीय मानतो. का मानू नये मी? मी निराशेच्या आणि संतापाच्या भरात असताना चित्यासारखी उडी घेऊन ठाकऱ्यांनी माझ्या हाताची बंदूक हिसकावून घेऊन माझे माथे ठिकाणावर आणले नसते तर कुठे होता आज भाऊराव आणि त्याच्या कार्याचा पसारा?”
…ही माणसं नसती तर आपण कुठे असतो भावांनो??? आजच्या नासलेल्या भवतालात ही माणसं आणि त्यांचे विचारच आपल्याला तारणार आहेत. हे सगळं आपण वाचलं पाहिजे, यांचा संघर्ष समजून घेतला पाहिजे. हे पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. ज्यांचं वर्चस्व मोडून या लोकांनी आपल्याला शिक्षण खुलं केलं… गुलामीच्या गर्तेतून वर काढलं, त्याच वर्चस्ववाद्यांच्या वळचणीला जाण्याची बेईमानी करणार्‍यांना इतिहास माफ करणार नाही.
…तर असं आहे सातारच्या मातीचं, ‘रयत’चं आणि प्रबोधनकार ठाकरेंचं नातं! प्रबोधनकार आणि कर्मवीर या गुरूशिष्याच्या जोडीला कडकडीत सलाम,” अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.

दरम्यान, त्यांच्या या पोस्टवर “‘प्रबोधन’कार एके काळी सातारारोड मधून निघत असे…. शाहू, फुले, आंबेडकर, प्रबोधनकार, भाऊराव पाटील, गाडगेबाबा यांची फार घट्ट वीण आहे सातारच्या मातीशी,” अशी कमेंट एका युजरने केली आहे. “या भारतामध्ये अशी लोक जन्माला आली हे भारतीय लोकांचे अतिशय मोठे नशीब आहे”, असं एका युजरने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran mane post about karmaveer bhaurao patil and prabodhankar thackeray hrc
Show comments