उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणारे अभिनेते किरण माने यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. कोणत्याही जातीवर अन्याय न करता आरक्षण द्या, या मागणीसाठी मराठा समाज संवैधानिक मार्गानं आंदोलन करत असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. किरण माने यांनी नेमकी काय पोस्ट केली आहे, ते जाणून घेऊयात.
“आम्ही हक्काचं आरक्षण मागतोय. बाकी कुठल्याही जातीवर अन्याय न करता ते द्या,” अशी मागणी करत लाख्खोंच्या संख्येनं मराठा समाज बाहेर पडलाय. आपल्या अधिकारासाठी संवैधानिक मार्गानं आंदोलन सुरूय. या गर्दीत माझे स्वत:चे कितीतरी नातेवाईक आहेत. आपल्या पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षिततेच्या चिंतेनं त्यांना हे पाऊल उचलायला मजबूर केलंय.
वयाची सत्तरी पार केलेले माझे एक नातेवाईकसुद्धा आंदोलनात हट्टाने सामील झालेत. मी फोन केला, “तुमची तब्येत आम्हाला महत्त्वाची आहे. परत या. लोकांनी घरात बसून टीव्हीवर राममंदिराचा सोहळा बघावा म्हणून सुट्टी दिलीय सगळ्यांना. नातवंडं, पाहुणे आलेत. एकत्र मिळून बघा.” ते म्हणाले, “नाही. ते बघून काय मिळनारंय? महागाई कमी हुनारंय का आपल्या पोरांना रोजगार मिळनारंय? आता आरक्षणातच माझा राम आहे. मुंबई हीच अयोध्या. नातवंडांसाठीच मी हे करतोय. आम्ही दुसर्याच्या ताटातला घास हिसकावून घेत नाही. आमचा हक्काचा आमच्या नातवंडांच्या मुखात पडायला हवा.”
…मोर्चा जिथे जिथे जातोय तिथे दलित, मुस्लिम, धनगर, माळी असा सगळा समाज पाण्यापासून खाण्याची सगळी सोय बघतोय. ग्राऊंड लेव्हलवरचा बहुजन फुटलेला नाही, हे आशादायी चित्र आहे. राजकीय चित्र काहीही दाखवूदेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रचंड इच्छा होती. ते म्हणालेही होते की ‘एक दिवस मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल, पण त्यावेळी ते द्यायला मी नसेन !’ महामानवाच्या दूरदृष्टीला सलाम. जय शिवराय जय भीम,” अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.
दरम्यान, आरक्षणाची मागणी करत मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजातील आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील मराठा आंदोलक या आंदोलनात सहभागी होत आहेत.