अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत पार पडले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली होती. या संमेलनाचा एक फोटो शेअर करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व अभिनेते किरण माने यांनी संताप व्यक्त केला आहे. या फोटोत महात्मा फुले व रवींद्र शोभणे यांचं नाव एकाच रांगेत असल्याने किरण मानेंनी नाराजी दर्शवली.
ठरवून बँड वाजवला अंमळनेरकरांनी, सरकारी साहित्य संमेलनाचा. त्याच्या लै कारणांपैकी हे सगळ्यात महत्त्वाचं कारण. अ.भा. साहित्य संमेलनात वर्चस्ववाद्यांनी बहुजनांच्या महामानवांची इज्जत कमी करण्याचा केलेला प्रयत्न बघा! हे ‘सांस्कृतिक राजकारण’ गेली हजारो वर्ष हे लोक खेळत आलेले आहेत. बेट्याहो, महात्मा फुलेंची इज्जत अशा कुटील खोड्या करून कणभरबी कमी झाली नाही… उलट लोकांनीच तुमच्या अब्रूची लक्तरं काढली.
अरे, महात्मा फुलेंसारख्या क्रांतीसुर्याच्या नांवाच्या बरोबरीनं, तुम्ही तुमच्या वळचणीतल्या लेखकांची नांव जोडता? शंभर जन्म घेतलेत तरी त्या महापुरूषाच्या पायाची धूळही होण्याची लायकी येणार नाही. फुलेंच्या साहित्यातनं समाज घडला, शिकला, क्रांती झाली. तुमी त्यांच्या बरोबरीनं जे नांव लिहीलंय, त्यांच्या लेखनानं तीन टक्के राहुद्या, अर्धा टक्क्यांच्या आयुष्यात केसभर तरी फरक पडलाय का? शोभणेंना तरी हे टायटल कसं मान्य झालं?? सद्सद्विवेकबुद्धी आहे की नाही???
मुख्यमंत्रीजी, शिंदेसरकार… तुम्ही सातारकर आहात. आपुलकीच्या नात्यानं सांगतो, तुम्हाला कुणीतरी याची कल्पना द्यायला पायजे होती. कितीबी झालं तरी पुर्वी तुमी बहुजनांच्या बाजूला होतात. आत्ता मी जे मानाचं शिवबंधन बांधलंय, तेच बंधन तुमीसुद्धा त्याच पवित्र ‘मातोश्री’च्या वास्तूत बांधलंय. तुमचा अनादर नाही करणार मी. मला माहिती आहे, या वर्चस्ववाद्यांच्या असल्या कपटाबद्दल तुम्हाला काहीही माहिती नसणार. एवढंच लक्षात घ्या की फुले नसते तर तुम्ही आणि मी, आपण सगळे बहुजन आत्ता गुलामीत सडत असतो. शोभणे नसते तर फारफारतर मराठीत उत्तरायण ही साहित्यकृती नसती. ती नसली तरी समाजाला फारसा फरक पडणार नाही.
शिंदेसाहेब, गैरसमज नसावा. शोभणे यांना लेखक म्हणून मी कमी लेखत नाही. ‘वर्तमान’ या कथासंग्रहातल्या अनेक कथांत मी स्वत:ला पाहिलं होतं… पण थेट महात्मा फुले??? कदापी नाही. ‘तथागत बुद्ध ते संत तुकाराम’ हे होऊ शकतं… ‘महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे होऊ शकतं… तसंच फारफार तर ‘गो.नि. दांडेकर ते रविंद्र शोभणे’ किंवा ‘राम गणेश गडकरी ते रविंद्र शोभणे’ असंही चाललं असतं.
मुख्यमंत्रीजी, अ.भा. साहित्य संमेलनाच्या समारोपाला तुम्ही येणार हे माहिती असूनही मंडप रिकामा होता. तुम्ही आलाच नाहीत. मी असं कधीच म्हणणार नाही की, त्याचवेळी मला आणि प्रविणदादांना ऐकायला मंडप फुल्ल भरलावता म्हणजे आम्ही लै मोठे आहोत. तुम्ही मानानं, पदानं, अनुभवानं माझ्यापेक्षा मोठे आहात. तुम्हाला सांगतो, तुम्हालाबी या वर्चस्ववाद्यांनी कारस्थान करुन बळीचा बकरा बनवलं. लोक नाराज होणार हे त्यांनी ओळखलं होतं. त्यासाठीच ही काडी केली होती.
भुजबळसाहेब, तुम्हाला तरी या कमानीवर अशा पद्धतीनं महात्मा फुलेंचं नाव लिहिलेलं मान्य आहे का? मान्य असेल तर प्रश्नच मिटला, पण नसेल तर याबद्दल तुम्ही कधी रान उठवणार?? जरांगेंवर टीका करताना जो तुमचा आवेश असतो, त्याच्या दहापट आवेश महात्मा फुलेंच्या सन्मानासाठी पाहिजे खरंतर…
महात्मा फुले हे एकमेव आहेत… अद्वितीय आहेत… सुर्य एकटा तळपत असतो. त्याच्याशेजारी नाव लिहिलं म्हनून काजव्याची त्याच्याशी बरोबरी होत नसते. विद्रोही साहित्य संमेलनाच्या दरवाजात फुलेंचा पुर्णाकृती पुतळा दिमाखात उभा होता. लाखो लोकांनी त्या पुतळ्याला आदरानं अभिवादन करुन फोटो काढले. तुमचा एक पैसा न घेता ‘विद्रोही साहित्य संमेलना’नं खणखण वाजवून दाखवलं. गर्दीचा उच्चांक मोडला. ‘उच्चवर्गीय’ संमेलनाला सरकारनं ‘पाच खोकी’ देऊनही द्रारिद्र्य लपत नव्हतं!
लहान तोंडी मोठा घास घेतोय. बहुजनांचं अस्सल रक्त आहे धमन्यात. निडरपना जन्मजात आहे. समजून घेतलंत तर आनंद आहे. राग धरलात तरी माझ्या म्हणण्यावरनं मी कणभरबी ढळणार नाही. माझं नुकसान करायचं तेवढं या वर्चस्ववाद्यांनी करून बघितलंय… अब इतना भी मत डराओ की डर ही खत्म हो जायेगा!,” अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.
किरण माने यांच्या या पोस्टवर नेटकरी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ‘किरणजी तुम्ही या असल्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवत आहात. पण तुम्ही लिहीत राहा म्हणजे समाज जागा होईल आणि यांचे मुखवटे आणि चेहेरे जगासमोर येतील,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.