लोकसभा निवडणुकांना अवघे काही दिवस उरले आहेत. त्यापूर्वी निवडणूक आयोगाने गुरुवारी (१४ मार्च) रात्री निवडणूक रोख्यांची माहिती त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार निवडणूक आयोगाने तपशील शेअर केले आहेत. यामध्ये कोणत्या पक्षाला किती किमतीचे रोखे मिळाले याची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर किरण मानेंनी केलेल्या दोन पोस्टनी लक्ष वेधून घेतलं आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेते व उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते किरण माने यांनी पहिल्या पोस्टमध्ये पाकिस्तानमधून आलेल्या इलेक्टोरल बाँड्सचा उल्लेख केला आहे. “भारतातल्या मागच्या निवडणुकीत, एका राजकीय पक्षाला थेट ‘पाकिस्तान’वरून मदत आलीवती भावांनो ! पुलवामामध्ये चाळीस जवान शहीद झाले. देश शोकसागरात बुडून गेला. आजवर एकही हल्लेखोर पकडला गेलेला नाही. पण त्यानंतर केवळ दोन महिन्यात, निवडणुकीसाठी पाकिस्तानातल्या ‘हब पॉवर’ नावाच्या कंपनीनं, एका राजकीय पक्षाला इलेक्टोरल बाँड्स दान केले ! काय कनेक्शन आहे हे?? पुलवामाचा फायदा कुठल्या पक्षाला झाला??? विचार करा. राष्ट्र प्रथम,” असं किरण माने यांनी लिहिलं आहे.
त्यांच्या दुसऱ्या पोस्टमध्ये करोनाची लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचा उल्लेख आहे. “‘सीरम इन्स्टिट्यूट’नं तयार केलेली कोविडवरची लस घेतली तुम्ही? त्यानंतर मिळणारं माननीय पंतप्रधानांचा फोटो असलेलं सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे?
त्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’नं १८ ऑगस्ट २०२२ ला एका राजकीय पक्षाला निवडणुकीसाठी करोडो रूपये दिल्याचा पुरावा इलेक्टोरल बॉन्डमधनं समोर आलाय!
बाकी त्यानंतर २३ ऑगस्टला आदर पुनावालाला कुठला राजकीय नेता भेटला… एकमेकांचं कौतुक कसं झालं… हे मी नाही सांगत बसणार. तुम्ही कमेन्ट बॉक्समध्ये लिहालंच.
बाय द वे… एक सांगायचं राहीलंच. आपल्या सगळ्या देशानं लसी टोचून घेतल्यानंतर, डिसेंबर २०२३ मध्ये या आदर पुनावालानं लंडन इथं भव्य, आलीशान बंगला विकत घेतला… ज्याची किंमत आहे, १४४६ करोड रूपये!
आणि हो, पुनावाला हा घोड्यांचा मोठा व्यापारीही आहे. नाही नाही, गुवाहाटी किंवा सुरतच्या घोड्यांचा नाही, खर्या घोड्यांचा. असो.
हो हो माहिती आहे, “कितीही आपटा येणार तर…”
पण आमच्यासाठी ‘राष्ट्र’ प्रथम… विषय कट!” अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.
किरण माने यांच्या दोन्ही पोस्टवर युजर्स विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘कोर्टाने योग्य वेळी रिपोर्ट बाहेर काढायला लावला. आजाराची पाळेमुळे खूप खोलात शिरली आहेत,’ ‘हो. पण यावर उपाय काय? बहुतेक सगळे राजकीय लोक ED च्या भीतीनं गपगार आहेत. आता देशाच्या भल्यासाठी चळवळीमधूनच लोक पुढे यायला हवेत,’ अशा कमेंट्स लोक करत आहेत.