किरण मानेंनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट त्यांनी ‘जवान’मध्ये छोटीशी पण प्रभावी भूमिका साकारणाऱ्या एका अभिनेत्यासाठी केली आहे. ओंकारदास माणिकपुरी असं या अभिनेत्याचं नाव आहे. त्याने चित्रपटात एका शेतकऱ्याची भूमिका केली आहे. काय आहे किरण मानेंची पोस्ट पाहुयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरण माने लिहितात, “‘जवान’मध्ये एका दलित शेतकऱ्याला छितपुट कर्जाच्या वसुलीसाठी त्याच्या बायको, मुलीसमोर आणि गावासमोर नग्न करून मारहाण केली जाते. ट्रॅक्टर ओढून नेला जातो. तरीही तो रडणार्‍या बायकोवर खेकसतो, “तोंड बंद ठेव. पोरीची परीक्षा आहे ना?” रडणार्‍या मुलीला शांत करत, “काही विशेष नाही गं त्यात. माझीच चूक होती. तू जा. पेपर दे नीट,” असं म्हणत मुलीला परीक्षा देण्यासाठी पाठवतो आणि स्वत:ला गळफास लावून घेतो.

पृथ्वीवरून कोणती गोष्ट डिलीट करायला आवडेल? गश्मीर महाजनीने घेतलं प्रसिद्ध अभिनेत्याच्या ‘या’ सिनेमाचं नाव

यानंतर पिच्चरमध्ये शाहरूख आपल्याला भानावर आणतो. देशातल्या शेतकर्‍यांचं वास्तव सांगतो. नंतर पिच्चरभर तो अनेक रूपांत जलवा दाखवतो. विजय सेतूपती आग ओकतो. नयनतारा लख्खपणे चमकते. दिपीका पदुकोण सुखावून जाते. अनेक अनेक कलाकार येऊन जातात. तरीही एवढ्या मोठ्या तगड्या, चकचकीत स्टारकास्टमध्ये या सिनमधला हा साधासुधा शेतकरी, त्याचा केविलवाणा तरीही स्वाभिमानी चेहरा प्रेक्षकांच्या मनामेंदूवर कोरला जातो… नीट लक्षात राहतो. एवढा प्रभावी अभिनय या अभिनेत्यानं केलाय.

“तरुणपणी खूप उद्दाम होतं, म्हातारं झालं आणि लाचार…”, गश्मीर महाजनीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

ओंकारदास माणिकपुरी असं या अभिनेत्याचं नांव. छत्तीसगढमधल्या एका छोट्या खेड्यातल्या गरीब शेतकर्‍याचा पोरगा. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यानं गावाकडच्या ‘नाटक मंडली’त काम करायला सुरूवात केली. ‘नाच्या’ म्हणून. उघड्या मैदानात होणार्‍या नाटकाला प्रेक्षक जमवण्यासाठी गाणी म्हणायची, जोक सांगायचे, मिमिक्री करायची, हे त्याचं काम. एक दिवस तो प्रख्यात नाट्य दिग्दर्शक हबीब तन्वीर यांच्या नजरेस पडला. तिथून पुढं त्यानं मागं वळून नाय पाहिलं भावांनो. उत्तरेकडच्या अभिजात नाटकांमध्ये त्याचं नाव आज लै मानानं घेतलं जातं. यापूर्वी तो आमिर खानच्या ‘पीपली लाईव्ह’ सिनेमातही आपल्याला दिसला होता.

दीपिका पदुकोणने शाहरुख खानला किस करतानाचा फोटो केला शेअर, पती रणवीर सिंहच्या कमेंटने वेधलं लक्ष

आपल्याकडे गावखेड्यांत तमाशातली वगनाट्यं, लोकनाट्यं, कलापथकं यात काम करणारे असे लै लै लै भन्नाट अभिनेते आहेत. ज्यांना योग्य दिग्दर्शकानं मार्गदर्शन केलं, एक संधी मिळाली तर ते त्याचं सोनं करतील. इरफान खान, नवाज, संजय मिश्रा, पंकज त्रिपाठी या उत्तरेकडच्या गांवातल्या पोरांनी जत्रेतल्या नाटकांपास्नं सुरूवात करून हे सिद्ध केलंय.

ग्रामीण मातीतनं वर आलेल्या ओंकारदासला यापुढेही अशा अनेक संधी मिळोत. थिएटरचा पाया असलेले, अभिनयाला अतिशय गांभीर्यानं घेणारे असे पॅशनेट नट भारतीय सिनेमा समृद्ध करणार आहेत… गावखेड्यातल्या प्रतिभावानांना प्रेरणा देणार आहेत. सलाम ओंकारदास…कडकडीत सलाम!”

दरम्यान, शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला जवान चित्रपट प्रदर्शनापासूनच बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. चित्रपटाने देशभरात ४५० कोटींहून अधिक कमाई केली आहे, तर जगभरात चित्रपटाने ८५० कोटींहून अधिक कलेक्शन केले आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran mane post for actor omkar das manikpuri farmer from jawan movie hrc
Show comments