आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेृतत्वाखाली मराठा समाजाने आंदोलन केलं. मोठ्या संख्येने मराठा समाज आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईच्या दिशेने येत होता. अशातच राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. इतकंच नाही तर त्यासंदर्भात अध्यादेशही काढण्यात आला आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर अभिनेते व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते किरण माने यांनी पोस्ट शेअर केली आहे.
“मराठा बांधवांनो, तहात हारू नका.
“…सदर अध्यादेश १६ फेब्रूवारी २०२४ पासून किंवा त्यानंतर लागू होईल.” आणि “…यामुळे बाधित व्यक्ती दरम्यानच्या काळात आपल्या हरकती, सूचना संबंधितांकडे नोंदवू शकतील, ज्या विचारत घेण्यात येतील.” हा तिढा लै लै लै महत्त्वाचा आहे.
निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर आहे. जागे रहा.
एक मराठा लाख मराठा,” अशी पोस्ट किरण मानेंनी केली आहे.
किरण माने यांच्यामते सरकारने फक्त आगामी निवडणुका लक्षात घेता मराठा समाजाला आश्वासन दिलंय. त्यामुळे त्यांनी तहात न हारण्याचं आवाहन केलं आहे. “एप्रिलमध्ये निवडणूक जाहीर करून…दीड महिन्याआधी आचारसंहिता लागू होईल.. हे एक प्रकारे गाजर आहे, असं दिसतंय,” अशाप्रकारच्या कमेंट्स किरण मानेंच्या पोस्टवर लोकांनी केल्या आहेत.