आतापर्यंत अनेक मालिका, नाटके, चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत किरण माने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. किरण माने यांना ‘बिग बॉस मराठी ४’ने वेगळी ओळख दिली. या कार्यक्रमामुळे त्यांचा चाहतावर्ग प्रचंड वाढला. किरण मानेही सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. ते नेहमीच त्यांना आवडलेल्या किंवा खटकणाऱ्या गोष्टींबद्दल सोशल मीडियावरून व्यक्त होत असतात. आता त्यांनी एक लांबलचक पोस्ट शेअर करत ‘तेंडल्या’ चित्रपटाचे कौतुक करताना मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना लक्ष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरण माने यांनी नुकताच प्रदर्शित झालेला ‘तेंडल्या’ हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट त्यांना खूप आवडला. हा चित्रपट पाहिल्यावर त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, “सिनेमा अस्स्सा असतो भावा! नादखुळा!! मराठी सिनेमाला ‘फॅंड्री’नं ज्या उंचीवर नेऊन ठेवलंवतं, तिथून आणखी सात मजले वर नेऊन ठेवलाय तो ‘तेंडल्या’नं. मी हे विधान अतिशय जबाबदारीनं करतोय. सचिन जाधव-नचिकेत वाईकर ही दिग्दर्शक जोडी येत्या काळात मराठी सिनेमाला ‘सोन्याचे दिस’ दाखवण्याची ताकद असणारी आहे, यात शंका नाही. लै दिवस मी एका प्रश्नावर मनापास्नं विचार करत होतो. मोठमोठ्या नाववाल्या दिग्दर्शकांशी यावर वादबी घातलाय : ‘उत्तम आणि लोकप्रिय मराठी सिनेमा बनवायला काय लागतं?”

आणखी वाचा : “‘TDM’ला शोज मिळत नाहीत आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ला…,” किरण मानेंनी व्यक्त केली खंत; पोस्ट चर्चेत

पुढे त्यांनी लिहिलं, “बोगस कथानकावर प्रचंड पैसा ओतून प्रेक्षकांवर दणादणा प्रसिद्धीचा मारा करणारा निर्माता? असा ‘बकरा’ गळाला लागलाय म्हणून अर्धवट लिहिलेल्या स्क्रिप्टवर घाईघाईत सिनेमा बनवणारा दिग्दर्शक? सुमार अभिनय असला तरी मोठ्ठं नाव असलेले ‘स्टार्स’? की गुंतवून टाकणारं, काळजाला हात घालणारं, मनामेंदूत घर करणारं कथानक, नाव नसलेले पण जीव ओतून काम करणारे प्रतिभावान अभिनेते, वेळ घेऊन कथा-पटकथेतील बारकाव्यांवर नीट काम करून, अभ्यास करून पडद्यावर नितांतसुंदर चित्र साकारणारा दिग्दर्शक? मराठीत पहिला पर्याय असलेल्या सिनेमांचा सुळसुळाट आहे गेली कित्येक वर्षे… दुसरा पर्याय मात्र दुर्मीळ. त्यासाठी कुणी निर्माता तयार नसतो. बजेट कमी, अनोळखी कलाकार वगैरेंमुळे त्या सिनेमाची पुरेशी प्रसिद्धी होत नाही. त्यामुळे प्रेक्षक येत नाहीत, असं त्यांचं मत आहे.”

“हे दुष्टचक्र संपवायला पायजे आपण असं कळकळीनं वाटायचं. उत्तम कथेची उत्तम मांडणी आणि नवोदितांचा तगडा अभिनय असलेला चांगला सिनेमा चालवायला पायजे. अशातच आज ‘तेंडल्या’ पाहिला! काय सांगू गड्याहो… ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशी अवस्था झाली!! तळमळीनं वाटलं की, सगळ्या मराठी मुलखातल्या सिनेमाप्रेमींना लाऊडस्पीकरवर ओरडून सांगावं की, भावा-बहिणींनो, ‘तेंडल्या’ नक्की बघा… आवर्जून बघा… शो कुठे आहेत ते शोधून काढा… लांब असेल तर वाट वाकडी करून जा, पण बघाच… मनमुराद हसाल, रडाल, टाळ्या वाजवाल, हरवून जाल… आणि थेटरातनं बाहेर पडताना लाखमोलाचं कायतरी घेऊनबी याल. आपलं हरवलेलं हवंहवंसं, लोभस, रंगीबेरंगी बालपण परत अनुभवावं असं प्रत्येकाला वाटतं… ती संधी देणारा ‘तेंडल्या’ हा भन्नाट, जबराट, नादखुळा पिच्चर आहे,” असेही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले.

हेही वाचा : “सिनेमा प्रसिद्धी देतो, मालिका पैसा देते पण नाटक…” किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या पोस्टच्या शेवटी त्यांनी लिहिले, “सचिन जाधव-नचिकेत वाईकर यांनी मराठीत लै लै वर्षांनी अशी कलाकृती आणलीय, जी फॅमिलीला सोबत घेऊन, पैसे खर्चून, थिएटरमध्ये जाऊन, स्वत:भोवती अंधार करून, एका रम्य विश्वात हरवून जाण्याचा आनंद लुटत पाहावी… जिच्यातनं स्वप्नं पूर्ण करण्यासाठीचं वेडेपण कायमचं काळजात कोरून घ्यावं… आपलं जगणं समृद्ध करणारे असे सिनेमे आले पायजेत राव… तगले पायजेत, गाजले पायजेत… सुमारांची सद्दी संपवायला लै टॅलेंटेड पोरं सज्ज आहेत, त्यांना बळ मिळायला पायजे!” आता त्यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून यावर त्यांचे चाहते कमेंट करत विविध प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran mane shared a post about tendlya film and criticize well known producers directors and actors rnv
Show comments