Kishori Shahane on Sons Girlfriend: अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. गुम हैं किसी प्यार में या मालिकेतून त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. त्या बिग बॉस मराठीमध्येदेखील स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. आता मात्र त्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
मुलाच्या गर्लफ्रेंडबाबत किशोरी शहाणे काय म्हणाल्या?
किशोरी शहाणे यांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधला. या मुलाखतीत त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा बॉबी विजनेही हजेरी लावली. या मुलाखतीत किशोरी शहाणे यांना विचारण्यात आले की, मुलाची गर्लफ्रेंड कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुमच्या मनात असते का? बॉबी त्याबद्दल तुमच्याशी बोलतो का? त्यावर किशोरी शहाणे म्हणाल्या, “तो तसं सगळंच सांगतो. मित्रांच्या बाबतीत मी त्याला कायम हेच सांगते की, चुकीची संगत नको. पण, तो नेहमीच आरोग्याविषयी जागरूक आहे. जर मित्र पार्टी करीत असतील, तर तो घरून जेवून जातो. चांगलं आरोग्य, करिअर यांवर त्यानं लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे त्याला बाकीच्या गोष्टी क्षुल्लक वाटतात.”
बॉबीनं त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल काही सांगितलं आहे का? त्यावर, “त्यांचा ग्रुप असतो. आमच्या फार्महाऊसलादेखील ते जातात. दोन-चार मुली, दोन-चार मुलं असतात. आता त्यामध्ये कोणाची कुठली जोडी असते, हे मी एवढं बघत बसत नाही. मला माझी मर्यादा ओलांडायची नाही, ज्यामुळे त्याला खोटं बोलावं लागेल”, असे म्हणत त्या कधी मुलाला गर्लफ्रेंडबाबत विचारत नसल्याचे किशोरी शहाणेंनी म्हटले.
तसेच तंत्रज्ञानाशी निगडित गोष्टींबाबत मुलगा बॉबी मदत करीत असल्याचे किशोरी शहाणे यांनी म्हटले. किशोरी शहाणे व त्यांचा मुलगा बॉबी अनेकदा सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. माय-लेकाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसते. तसेच, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावदेखील होताना दिसतो. अनेक गाण्यांवर किशोरी शहाणे व त्यांचा मुलगा बॉबी विज डान्स करताना दिसतात. सोशल मीडियावर बॉबीच्या फॉलोअर्सची संख्या जास्त आहे. त्याने बालकलाकार म्हणूनही काम केले आहे. त्याला अभिनयात काम करायचे आहे, हे त्याने स्पष्ट केले आहे. तसेच, सध्या तो काही प्रोजेक्टमध्ये काम करीत असल्याचा खुलासादेखील त्याने केला. आता तो कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.