कलाकारांविषयी, त्यांच्या आयुष्याविषयी तसेच त्यांच्या रोजच्या जगण्याविषयी चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. अनेकदा कलाकार त्यांची त्वचा, केस निरोगी ठेवण्यासाठी काय करतात असाही प्रश्न चाहत्यांना पडत असतो. अनेक लोकप्रिय कलाकार मुलाखतींमध्ये याविषयी बोलताना दिसतात. या कलाकारांचा महिन्याचा साधारण खर्च किती असेल, असा अंदाजही बऱ्याचदा प्रेक्षकांकडून बांधला जातो. आता मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali)ने एका मुलाखतीत तिचा महिन्याचा खर्च किती आहे, यावर वक्तव्य केले आहे.
मला खूप वर्षांपासून गणिताला…
अभिनेत्री प्राजक्ता माळी अनेकदा तिच्या अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरील पोस्ट तसेच विविध मुलाखतींमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने नुकतीच ‘सुमन म्युझिक मराठी’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीला तिचा महिन्याचा एकूण खर्च किती असतो, असा प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना प्राजक्ता माळीने सुरुवातीला हसत म्हटले, “मला खूप वर्षांपासून गणिताला बसायचं आहे की माझा खर्च किती होतो, पण ते होतच नाही.” पुढे अभिनेत्रीने म्हटले, “पण फार नाहीये. मी ती व्यक्ती आहे, जी कमी संसाधनामध्ये आयुष्य जगते. कमी संसाधने वापरते, म्हणजे मी कपडे लवकर फेकून देत नाही. नवीन काही भांडी वगैरे आणण्याची मला काही आवड नाही. आधीचं मटेरिअल संपल्याशिवाय मी मेकअप वैगेरे काही आणत नाही. असं सगळं असल्यामुळे कमी खर्च असावा. पण, तरी आता कर्जाचे हप्ते असल्यामुळे लाखो रुपये असेल.”
पुढे तिला तिच्या स्कीन केअर रूटीनविषयी विचारले. यावर बोलताना अभिनेत्रीने म्हटले की, मी उत्तम जेवते. मी कुठलेही सोडा असलेले पेय पित नाही. मी खूप कमी मैद्याचे पदार्थ खाते. सोडा, मैदा, साखर बंद करा किंवा कमी करा. जितकं तुम्ही खाता तितकी तुमच्या शरीराची हालचाल झाली पाहिजे. मी असं गणित ठेवते की आज सुट्टी आहे आणि मी दोन चित्रपट पाहणार आहे, तर मी जागेवरून हलणार नाहीये, तर मी कमी खाल्लं पाहिजे. आज मी शूट करतेय तर मी व्यवस्थित भाजी, पोळी, वरण, ताक असा सगळा आहार घेते. कारण मला काम करायचं आहे. मी रोज सकाळी एक चमचा तूप खाते आणि पाणी पिते. चौरस आहाराला मी महत्त्व देते. अत्यंत आनंदाने मी सांगू इच्छिते की रात्री आठनंतर मी जेवत नाही. जेवण, जीवनपद्धती, पाणी पिण्याच्या तऱ्हा याचा सगळ्याचा जास्त तुमच्या शरीरावर प्रभाव पडतो. योग व प्राणायम हे महत्त्वाचे आहे. याबरोबरच रोज उठल्यानंतर मी त्वचेसाठी टोनर, मॉइश्चराइझर, सनस्क्रीन वापरते. मेकअप करणार असेल तर आधी प्रायमर आणि मग मेकअप करते. रात्री झोपताना टोनर, त्यानंतर नाइट क्रीम किंवा तेल लावते, असे म्हणत ती तिच्या निरोगी त्वचेसाठी काय करते हे तिने सांगितले आहे.
दरम्यान, प्राजक्ता माळी लवकरच प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.