अभिनेत्री मृण्मयी देशपांडे(Mrunmayee Deshpande) नुकतीच एक राधा एक मीरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात मृण्मयी देशपांडेसह अभिनेता गश्मीर महाजनी व सुरभी भोसले प्रमुख भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता मात्र मृण्मयी देशपांडे वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीत तिने तिचा महिन्याचा खर्च किती असतो, हे सांगितले आहे.
मृण्मयी देशपांडे म्हणाली…
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे व तिचा पती स्वप्नील राव यांनी नुकताच आरपार या यूट्यूब चॅनेलशी संवाद साधला. त्यावेळी मृण्मयीने म्हटले की, शेतामध्ये आल्यानंतर आमचा जो आठवड्याचा खर्च आहे, तो जवळजवळ ५००-६०० रुपये आहे. महिन्यात आम्ही २००० रुपयांत आनंदात जगतो. गेल्या पाच वर्षांत मला आठवत नाही की, मी वारंवार कपडे विकत घेतले. माझा वर्षाचा कपड्यांचा खर्च जवळजवळ २० हजार रुपये असेल. माझ्या प्रोफेशनला हा खर्च नगण्य आहे. त्याव्यतिरिक्त मला काही लागतच नाही”, असे म्हणत अभिनेत्रीने तिचा महिन्याचा खर्च सांगितला आहे. याबरोबरच, त्यांनी त्यांच्या शेतीविषयीदेखील माहिती दिली. एकाचवेळी ते विविध प्रकारची उत्पादने घेत असल्याचे म्हटले. स्ट्रॉबेरीसह विविध इतर फळे, फळभाज्या, कांदा, झेंडू, माठ, लसून, मिरची अशी विविध उत्पादने घेत असल्याचे या जोडप्याने सांगितले. त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरूवात केली आहे. याबरोबरच स्वप्नील वर्कशॉप घेत असल्याचे म्हटले.
मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर ती व्हिडीओ शेअर करत असते. महाबळेश्वर येथे मृण्मयी व तिच्या पतीने सुंदर घर बांधले आहे. घराच्या आजूबाजूला त्यांची शेतजमीन आहे. या शेतातील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. शेतात सध्या काय काम सुरू आहे, कोणत्या पिकाचे उत्पन्न घेतले जाणार आहे, याबद्दलही ती अनेकदा माहिती देते. मृण्मयी तिच्या पतीसह शेतात विविध प्रयोग करताना दिसते. तिने कोंबड्यादेखील पाळल्या असून, त्यांना त्यांच्या शेतात गाय हवी असल्याचेदेखील या जोडप्याने म्हटले आहे.
दरम्यान, मृण्मयी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. सुभेदार, महाराष्ट्र शाहीर, चंद्रमुखी, फतेशिकस्त, १५ ऑगस्ट, बोगदा अशा अनेक चित्रपटांत तिने काम केले आहे. याबरोबरच अभिनेत्री तिच्या बहिणीबरोबरचे म्हणजे गौतमीबरोबरचे अनेक व्हिडीओ शेअर करताना दिसते. प्रेक्षक त्यांच्या व्हिडीओला मोठी पसंती देतात. आता मृण्मयीची प्रमुख भूमिका असलेला एक राधा एक मीरा हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.