अभिनेत्री क्रांती रेडकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेली अनेक वर्षं ती वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेही अनेकदा लक्ष वेधून घेत असते. मजेशीर रील्स पोस्ट करत असते. आता अशाच एका तिच्या रीलवर एका नेटकऱ्याने केलेली कमेंट आणि त्याला क्रांतीने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.
क्रांती रेडकरने आज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचं एक विनोदी रील शेअर केलं. या रीलमध्ये तिने लिफ्टमध्ये येणारी माणसं कशा कशा प्रकारची असतात, हे तिच्या हटके अंदाजात सांगितलं. पण एका नेटकार्याला हे रील अजिबात आवडलं नाही आणि त्याने या रीलवर नकारात्मक कमेंट केली.
क्रांतीने हे मजेशीर रील शेअर करताच एकाने कमेंट करत लिहिलं, “मॅम, या व्हिडीओने माझी दहा मिनिटं वाया घालवली. समजलं काही नाही पण माझा वेळ वाया घालवल्याबद्दल धन्यवाद.” या कमेंटला क्रांतीने देखील जसंच्या तसं उत्तर दिलं. तिने लिहिलं, “आणि तुमची कमेंट वाचून माझीही दहा मिनिटं वाया गेली.”

तर आता क्रांतीने दिलेलं हे उत्तर खूप चर्चेत आलं असून याला लाइक करून आणि प्रतिक्रिया देत तिचे चाहते कमेंट करत तिचं हे उत्तर आवडल्याचं सांगत आहेत. तर याचबरोबर अनेकांनी तिचं हे रील आणि हा मजेशीर अंदाज आवडल्याची कमेंट केली आहे.