अभिनेत्री करणारी रेडकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेली अनेक वर्ष ती वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेही अनेकदा लक्ष वेधून घेत असते. आता तिने शेअर केलेलं एक रील चर्चेत आलं आहे.
क्रांती रेडकरचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. क्रांतीही सोशल मीडियावर तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत त्यांच्या संपर्कात असते. तिचे गमतीशीर रील्स खूप व्हायरल होत असतात. तिचा हजरजबाबीपणा आणि तिची विनोदबुद्धी चाहत्यांना फार आवडते. आत एक रील शेअर करत तिने एक ते दीड आठवड्यात अडीच किलो वजन कमी केलं असं सांगत ते कसं कमी केलं याचं सिक्रेट शेअर केलं आहे.
आणखी वाचा : दोन दिवसांत पिंपल घालवायचेत? सुकन्या मोनेंनी सांगितला सोपा घरगुती उपाय, म्हणाल्या…
क्रांतीने आज तिचं एक रील पोस्ट केलं. यात ती गमतीत म्हणते, “मी गेल्या दीड आठवड्यात अडीच ते तीन किलो वजन कमी केलं आहे. आता तुम्ही म्हणाल की कसं केलं तुम्ही? याचं सिक्रेट काय? तर सिक्रेट काही नाही. सिक्रेट खूप सोपं आहे. उजव्या हाताला पांढऱ्या रंगाचं नेलपॉलिश लावायचं. त्यात ते जेल असलं आणि थोडं महाग असलं तर तुम्ही हे करणारच.”
पुढे ती म्हणाली, “एकतर आपण आहोत भारतीय. आपल्याला हातानी खायची सवय. त्यात तुम्ही जर मालवणी असाल तर मासे आणि भात. माशाची कढी तर मस्त कालवून खायची. ती तुम्हाला काट्या चमच्याने खावी लागणार आणि मग तुम्हाला त्याची चवंच लागणार नाही. मग तुम्ही काय करणार? कमी खाणार. असं करत करत मी गेले दीड आठवडे नीट जेवतच नाहीये. कारण काट्या चमच्यानी मला चवंच लागत नाही ना. तर हे जे पांढरं नेलपॉलिश आहे ते वजन कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. किमान माझ्यासाठी तरी. मला नंतर धन्यवाद म्हणा.” आता तिची ही मजेदार पोस्ट खूप चर्चेत आली असून तिच्या या भन्नाट कल्पनेचं सर्वजण कौतुक करत आहेत.